नातेवाईकांना पाहताच युवकाची पहिल्या मजल्यावरून उडी; भावालाही भावनांचा आवेग, दोघेही रुग्णालयात! भाग्यनगर (प्रतिनिधी) – सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भाग्यनगर पोलिसांच्या दिवाळीत मात्र एका युवकाने चांगलाच मिठाचा खडा टाकला. पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून थेट उडी मारण्याचा पराक्रम केल्याने युवक जखमी झाला. विशेष म्हणजे, आपल्या भावाला उडी मारताना पाहून दुसऱ्या भावालाही भावनांचा जोरदार उमाळा आला आणि तोही जखमी भावासोबत उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. हा सगळा थरार आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्यात घडला. प्राप्त माहितीनुसार, शेजारच्या जिल्ह्यातील एक आणि परभणी जिल्ह्यातील एका तालुक्यातील अशा दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. शिक्षणासाठी आलेल्या या मुलींच्या बाबतीत शिक्षणाव्यतिरिक्त नेमके कोणते उद्योग सुरू होते, हा तपासाचा विषय आहे. ओंकारेश्वर शहाणे आणि धुळे कार्तिक जुळे (रा. जवळा झुटा, ता. पाथरी, जि. परभणी) या दोन युवकांसोबत त्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना भाग्यनगर पोलीस ठाणे येथे आणले होते. पोलिसांनी दोन्ही मुलींना सोडून दिले होते; मात्र संबंधित युवकांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ओंकारेश्वर शहाणे याने आपल्या नातेवाईकांना पहिल्या मजल्या वरून पाहिले आणि पुढचा विचार करण्याआधीच पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. या उडीत त्याला दुखापत झाली. भावाचा हा स्टंट पाहून दुसऱ्या भावालाही भावनांचा आवेग अनावर झाला. परिणामी, पोलिसांना दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवावे लागले. शिक्षणासाठी आले की वेगळ्याच अभ्यासा साठी? दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून सोबत नेण्याचा प्रकार हा केवळ गंमतीचा किंवा किरकोळ प्रकार समजण्यासारखा नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न यात गुंतलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कायदेशीर कारवाई काय करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मात्र या निमित्ताने पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवताना त्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. शिकण्याच्या वयात शिकायचे असते; बाकीच्या उद्योगांसाठी आयुष्याचा मोठा कालावधी पुढे पडलेला असतो, एवढा साधा धडा घरातूनच मिळायला हवा. एकीकडे दिवाळीचा आनंद, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना भाग्यनगर पोलीस ठाण्यात मात्र वेगळ्याच प्रकारची आतषबाजी पाहायला मिळाली. एका युवकाच्या उडीने पोलिसांची दिवाळीची शांतता भंग झाली, तर भावाच्या भावनिक प्रतिक्रियेने प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला. त्यामुळे सणासुदीच्या काळात भाग्यनगर पोलिसांच्या दिवाळीवर या घटनेने खरोखरच मिठाचा खडा पडला, असे म्हणावे लागेल! Kanthak Suryatal Post Views: 7 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध सावकारी व जबरी कर्जवसुलीविरुद्ध नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम ; नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात*