नांदेड (प्रतिनिधी) -ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या चर्चित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी नांदेड येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाकपच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकार्यांमार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉ. गोविंद पानसरे यांनी सन 1988 मध्ये शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला असून विक्रीचे विक्रमही प्रस्थापित झाले आहेत.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दोन दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला पानसरेकडे पाठवतो अशी धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय त्यांच्या आई व पत्नीबाबतही खालच्या स्तरावरील भाषा वापरून गंभीर अपमान व विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असून कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणारी असल्याचे भाकपने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित आमदारांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, त्यांची आमदारकी रद्द करावी, तसेच लेखक, प्रकाशक व कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच प्रकाशक प्रशांत आंबी व त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. या निवेदनावर कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.देवराव नारे, कॉ. वैशाली धुळे, कॉ.गणेश संदूपटला व कॉ.प्रकाश बैलकवाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
आ.संजय गायकवाडांवर कठोर कारवाई करा;भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
