महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात आणि आकर्षक फलक (बॅनर) लावून साजरी केली जाते. या निमित्त शहरातील प्रमुख चौकांमध्ये बाबासाहेबा़चे विचार, सामाजिक संदेश देणारे बॅनर आणि सोशल मीडियावर ‘जय भीम’ स्टेटस लावून समतेचा व ज्ञानाचा उत्सव साजरा केला जातो. भीम जयंतीचे अनेक बॅनर डिझाइन उपलब्ध असतात. त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बॅनरवर अनेकदा बाबासाहेबांचे विचार छापलेले असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसाठी विशेष बॅनर्स आणि व्हिडिओ स्टेटस तयार केले जातात. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठमोठ्या शहरांतून भव्य मिरवणुका काढल्या जातात. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत खेडोपाडी जयंती साजरी केली जाते. काही लोक बॅनरबाजीपेक्षा ग्राउंड लेवलवर सामाजिक कार्य करण्याला अधिक महत्त्व देतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक वास्तववादी चित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहेत. ही चित्रे प्रामुख्याने आंबेडकर जयंती निमित्त डिजिटल मानवंदना देण्यासाठी तयार केली जातात. तेव्हा मिरवणूकीत फिरणाऱ्या लोकांना दिसले पाहिजेत यासाठी मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणावर बॅनर लावलेले दिसतात. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाबासाहेबांच्या संदर्भात अनेक गोष्टी केल्या जात आहेत. मिडजर्नी किंवा ड्रीमना सारख्या साधनांचा वापर करून बाबासाहेबांचे उच्च दर्जाचे एचडी फोटो बनवले जातात, ज्यात ते निळ्या कोटात किंवा पुस्तकांसह दिसतात. जुन्या फोटोंना एनिमेट करून बाबासाहेब चालताना किंवा भाषण देताना दाखवणारे व्हिडिओ बनवले जात आहेत, जे पाहताना ते जिवंत असल्याचा भास होतो. युजर्स स्वतःचे फोटो एआयमध्ये अपलोड करून बाबासाहेबांच्या आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेतील चित्रांमध्ये स्वतःला जोडू शकतात. असेही बॅनर शहरांमध्ये लागलेले असतात. काही फोटोंमध्ये दुरून पाहिल्यास बाबासाहेबांचा चेहरा दिसतो, पण जवळून पाहिल्यावर ती केवळ झाडे किंवा घरांची रचना असते. मात्र, हे फोटो पूर्णपणे एआय निर्मित असून ते वास्तव नसल्याचे सांगण्यासाठी अनेक फॅक्ट-चेक पोर्टल तयारच आहेत. यावर्षी सर्वत्र बॅनरचा कहरच केला गेला आहे. १३ तारखेपर्यंत जिथे जागा असेल तिथे बॅनर लागले. हसणारे आणि रागात पाहणारे बाबासाहेब विचित्र दिसताहेत. काही जणांनी तर बुद्धालाच फिदीफिदी हसायला लावले. आणि बुद्ध हसला… याला काही एक अर्थ होता. बाबासाहेबांपेक्षा बॅनरबाजांचेच फोटो शिरजोर झालेले दिसतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एआय तंत्रज्ञानाचा कसाही वापर करणे योग्य नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय सुंदर आणि जिवंत वाटणारे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे तंत्रज्ञान वापरून लोक त्यांच्याप्रती अभिवादन करण्यासाठी नवनवीन प्रकारे फोटो तयार करत आहेत. काही एआय टूल्सद्वारे जुन्या फोटोंना अशा प्रकारे एडिट केले जाते की बाबासाहेब हसताना किंवा हालचाल करताना दिसतात. बाबासाहेबांना एक दैवी वलय असलेले किंवा आधुनिक पार्श्वभूमीवर दाखवणारे हाय-डेफिनेशन फोटो तयार केले जात आहेत. एआयच्या मदतीने लोक स्वतःचे फोटो बाबासाहेबांसोबत किंवा त्यांच्या आशीर्वादाच्या मुद्रेत एडिट करून घेत आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या चेहऱ्याशी बाबासाहेबांचा चेहरा जुळवला जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे विटंबना करण्यासाठी किंवा इतर चुकीच्या कामासाठी भविष्यात याचा वापर केला जाऊ शकतो. हे थांबलेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (भीमजयंती) ही जगभरात एक मोठा वैचारिक आणि सामाजिक उत्सव म्हणून साजरी केली जाते. मात्र, अलिकडच्या काळात या उत्सवाचे स्वरूप काहीसे ‘अतिउत्सवी’ आणि दिखाव्याकडे झुकलेले दिसून येत आहे. शहरांमध्ये राजकीय पक्षांकडून लावले जाणारे अवाढव्य फ्लेक्स आणि बॅनर्स हे श्रद्धेपेक्षा शक्तीप्रदर्शनाचे माध्यम बनत आहेत. अनेक राजकीय पक्ष या उत्सवाचा वापर आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी करतांना दिसतात, ज्यामुळे उत्सवाचे मूळ उद्दिष्टं बाजूला पडत चालले आहेत. मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे डीजे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मूळ वैचारिक शांततेपेक्षा गोंगाटाला अधिक महत्त्व मिळत असल्याची टीका अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते. मोठ्या आवाजाच्या संगीत प्रणालीमुळे वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना त्रास होतो. नाशिकमध्ये एका घटनेत मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याचीही बातमी होती. मोठ्या आवाजाचे ठोके असल्यामुळे आणि ते सहन न झाल्यामुळे ते घडले होते. अनेकांसाठी भीमजयंती हा केवळ नाचण्याचा किंवा रॅली काढण्याचा दिवस ठरत आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालण्यापेक्षा केवळ त्यांच्या प्रतिमांची पूजा आणि मोठ्या मिरवणुकांवर अधिक भर दिला जातो. उत्सवाचे स्वरूप आता अधिक व्यक्तीपुजेसारखे म्हणजेच दैवतीकरण होत असून त्यात वैचारिक गांभीर्य हरवत चालल्याचे मत व्यक्त केले जात आहे. भीम जयंतीच्या उत्सवात डीजे नसावा, असे मत मांडण्यामागे काही सामाजिक, वैचारिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि उत्सवाचे गांभीर्य राखण्यासाठी अनेक विचारवंत आणि संघटना विविध बाबींवर भर देतात. बाबासाहेबांचे मुख्य ब्रीदवाक्य “शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे होते. डीजेच्या गोंधळात त्यांचे विचार, भाषणे आणि क्रांतिकारी गाणी (भीमगीते) नीट ऐकू येत नाहीत. त्याऐवजी प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर दिल्यास समाजाचे प्रबोधन अधिक प्रभावीपणे होते. बाबासाहेबांनी आयुष्यभर संविधानाचे आणि कायद्याचे पालन करण्याचा संदेश दिला. डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणारी अशिस्त यामुळे उत्सवाच्या मूळ उद्देशाला बाधा येऊ शकते. डीजेवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा समाजातील गरजू मुलांचे शिक्षण, आरोग्य किंवा गरीब कुटुंबांच्या मदतीसाठी वापरल्यास तो बाबासाहेबांना खरा अभिवादन ठरेल. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो. एका कल्याणकारी समाजाची निर्मिती करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न लक्षात घेता, इतरांना त्रास होईल असे वर्तन टाळणे महत्त्वाचे मानले जाते. पारंपरिक वाद्ये किंवा भीमगीतांच्या माध्यमातून उत्सवात एक वेगळीच ऊर्जा असते. डीजेवरील गाण्यांमध्ये अनेकदा मूळ गीतांचा अर्थ बदलला जातो, जो टाळण्यासाठी शांततेत आणि विचारपूर्वक जयंती साजरी करण्याचे आवाहन केले जाते. याचा अर्थ असा नाही की आनंद साजरा करू नये, तर उत्सवाचे स्वरूप प्रबोधनात्मक आणि रचनात्मक असावे, जेणेकरून बाबासाहेबांचे कार्य जगासमोर आदर्श ठरेल. भीम जयंतीला डीजेचा वापर मुख्यत्वे उत्साही तरुण पिढीद्वारे जल्लोष साजरा करण्यासाठी आणि ‘बुद्ध भीम’ गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार मोठ्या आवाजात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. हे मिरवणुकांमधील एकजुटीचे, ऊर्जेचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या उत्सवाचे प्रतीक मानले जाते, तरीही ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. भीम जयंती हा एक मोठा उत्सव बनला आहे, आणि डीजेच्या तालावर तरुणाई बाबासाहेबांच्या विचारांचा जल्लोष साजरा करते. आधुनिक ‘भीमगीते’ आणि ‘डीजे रिमिक्स’ गाण्यांच्या माध्यमातून तरुणाईला बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल आणि विचारांबद्दल माहिती मिळते आणि ते प्रेरित होतात. डीजे मिरवणुकांमध्ये हजारो लोकांची उपस्थिती आणि एकजूट दिसून येते, जी बाबासाहेबांच्या ताकदीचे प्रदर्शन मानली जाते. हा उत्सव आता फक्त एका समाजापुरता मर्यादित नसून, विविध समाजाचे लोक यात सहभागी होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. डीजेचा वापर करताना आवाजाची मर्यादा पाळणे आणि शांतता न भंग करणे कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तसे पोलीस प्रशासन सहकार्यासाठी आवाहनही करीत आहे. भीम जयंतीच्या अतिउत्सवी स्वरूपावर टीका होत असली, तरी समाजातील काही गट याला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी डीजेवर खर्च करण्याऐवजी संविधानाच्या प्रती किंवा पुस्तकांचे वाटप केले जाते. रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, भोजनदान आणि आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांमधून जयंती साजरी करण्याचा कलही वाढतो आहे, ही एक आशादायक बाब आहे. काही जिल्ह्यांमध्ये / शहरांमध्ये प्रशासनाच्या आवाहनानुसार डीजेमुक्त शांततामय मिरवणुका काढण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. भीमजयंती हा केवळ एक सण नसून तो एका क्रांतीचा उत्सव आहे. त्याचे ‘अतिउत्सवी’ रूप बाबासाहेबांच्या शांततामय आणि प्रज्ञावान विचारांना छेद देणारे ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भीम जयंती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी साजरी केली जाते. ‘वाचून की नाचून’ हा प्रश्न त्यांच्या अनुयायांमध्ये वारंवार चर्चिला जातो. बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्ञानाची उपासना केली. त्यांच्या विचारांचा खरा सन्मान करण्यासाठी त्यांचे साहित्य, त्यांचे संविधान आणि त्यांचे विचार वाचणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण त्यांची प्रगल्भ विचारधारा प्रत्यक्ष जीवनात उतरवू शकू. काही लोकांच्या मते, हा आनंदाचा उत्सव असल्याने तो वाजतगाजत आणि नाचून साजरा करण्यात काही गैर नाही. हा आनंद व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, मात्र तो बेभान न होता आणि व्यसनांपासून दूर राहून असावा, असे अनेक विचारवंतांचे मत आहे. खऱ्या अर्थाने जयंती साजरी करायची असेल तर ‘वाचून आणि नाचून’ दोन्हीचाही मेळ घालता येईल. आनंद साजरा करताना शिस्त पाळणे आणि त्यांच्या विचारांचे वाचन करून ते इतरांपर्यंत पोहोचवणे हेच खऱ्या अनुयायांचे लक्षण मानले जाते. केवळ नाचून जयंती साजरी करणे अपूर्ण आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले ‘ज्ञानाचे शस्त्र’ चालवण्यासाठी वाचन आणि विचारांचे आचरण करणे अधिक आवश्यक आहे. भीम जयंती निमित्ताने काही प्रश्नांना गांभीर्याने घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता बिघडवण्याचे किंवा दंगल घडवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या काही घटना किंवा इशारे समोर आले आहेत. प्रशासनाने अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मुख्य घडामोडी आणि खबरदारीचे उपाय पण करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात दंगल नियंत्रण पथके आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या मार्गांवर आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे देखरेख केली जात आहे. विविध शहरांमध्ये पोलीस प्रशासनाने सर्व धर्मीय नेते आणि स्थानिक मंडळांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीला कुणीही बळी पडणार नाहीत असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नये. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला कळविले पाहिजे. जयंती उत्सव साजरा करताना स्थानिक मंडळांनी पोलीस आणि प्रशासनाशी समन्वय ठेवायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे आणि शांततेच्या मार्गाचे पालन करून हा उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांकडूनही केले जात आहे, हे विशेष. आंबेडकरी तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता ही सध्याच्या काळातील एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तरुणांच्या खांद्यावर समाजाच्या प्रगतीची धुरा सोपवली होती, तोच तरुण वर्ग आज विविध व्यसनांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहे. वाढती बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तरुणांमध्ये नैराश्य येते, ज्यातून सुटका मिळवण्यासाठी ते व्यसनाकडे वळतात. मित्रपरिवाराचा दबाव, फॅशन म्हणून व्यसन करणे किंवा व्यसनी व्यक्तीला ‘कूल’ समजणे यांसारख्या मनोवृत्तीमुळे तरुण नशेकडे ओढले जातात. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याऐवजी केवळ मिरवणुकीत दारू पिऊन नाचण्यात धन्यता मानणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अंमली पदार्थांसोबतच स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अतिवापर हेदेखील एक प्रकारचे डिजिटल व्यसन बनले आहे, ज्यामुळे बौद्धिक पातळी खालावत आहे. शारीरिक व्याधींसोबतच मानसिक आरोग्य बिघडते, ज्यामुळे तरुणांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो. व्यसनामुळे कर्ता पुरुष बरबाद झाल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आंबेडकरी चळवळीला बौद्धिक आणि सामाजिक नेतृत्व देऊ शकणारा तरुण वर्ग व्यसनाधीन झाल्यामुळे चळवळीची गती मंदावते. व्यसनाधीनता ही केवळ वैयक्तिक समस्या नसून ती समाजाच्या विकासातील अडथळा आहे. यावर मात करण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. भीम जयंतीला संविधानाचे सौंदर्य लाभलेले आहे. त्याला कुरुप बनवू नये. ‘भीमजयंतीचे संविधान सौंदर्य’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे देशाला दिलेली मानवी मूल्ये आणि समतेच्या विचारांचा उत्सव. भीमजयंती साजरी करताना आपण केवळ एका महामानवाचा जन्मदिवस साजरा करत नाही, तर त्यांनी संविधानातून दिलेल्या न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा गौरव करतो. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही संविधानाच्या प्रस्तावनेतील त्रिसूत्री भीमजयंतीचा खरा गाभा घटक आहे. समाजात जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी देणे, हे या संविधानाचे सर्वात मोठे सौंदर्य आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाद्वारे आणि संविधानातील कलमांद्वारे स्त्रियांना अन्यायाच्या साखळदंडातून मुक्त केले आणि त्यांना मतदानापासून ते शिक्षणापर्यंतचे समान अधिकार दिले. संविधानाने केवळ राजकीय लोकशाहीच नाही, तर ‘सामाजिक लोकशाही’ दिली आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जगण्याची पद्धत म्हणून स्वीकारली गेली आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून त्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याची हमी देण्यात आली आहे. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्याला जनतेच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची दिशा दिली गेली आहे. भीमजयंती साजरी करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव ठेवणे आणि त्यातील मूल्ये स्वतःच्या आयुष्यात जोपासणे होय. भीमजयंतीच्या निमित्ताने हा संकल्प आपण करु या आणि पुढे जाऊ या. धन्यवाद, जयभीम! – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३. Kanthak Suryatal Post Views: 970 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पहिल्याच दिवशी मोठी कारवाई; 1 लाख 17 हजार 642 रुपयांचा गुटखा जप्त बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट