खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई; दोन गंभीर गुन्ह्यांची उकल

नांदेड(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील तसेच उस्माननगर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 173/2026 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपी सूरज पि. सुनील कदम (वय 22, रा. विनायकनगर, मराठा बारच्या मागे, नांदेड) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परभणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने कारवाई करत मानवत रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची चौकशी केली असता त्याने उस्माननगर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2024 अंतर्गत दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातही तो फरार असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख,पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे,पोलीस अंमलदार विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे, राजीव घुले, सुधाकर मरदोडे, राहुल लाठकर,अदनान पठाण, नागनाथ चापके तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
फरार आरोपीला अटक करून दोन गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला गती दिल्याबद्दल संबंधित पथकाचे पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून इतर फरार आरोपींविरुद्धही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!