नांदेड (प्रतिनिधी)- राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नांदेड येथे बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) मंजूर संख्येपेक्षा कमी मनुष्यबळावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा जबाबदारी सांभाळणारे हे पथक सध्या अनेक अडचणींना सामोरे जात असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड बीडीडीएस पथकासाठी दोन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, ९ तांत्रिक कर्मचारी, २ श्वान संचालक, ३ चालक तसेच २ श्वानांची नियुक्ती पूर्वीपासून मंजूर आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात फक्त दोन पोलीस निरीक्षक व मर्यादित पोलीस अमलदार उपलब्ध आहेत.
पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती म्हणजे साहेबाच्या आदेशाने लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सुरक्षा रक्षक म्हणून करण्यात आल्याची माहिती मिळत असून, संबंधित कर्मचारी बीडीडीएस विभागातून वेतन घेत आहे. त्यामुळे आधीच कमी असलेले मनुष्यबळ आणखी घटल्याचे दिसून येते. सध्या पथकाकडे केवळ एकच श्वान असून त्यासाठी दोन संचालक कार्यरत आहेत. यापूर्वी दोन श्वान आणि चार संचालक कार्यरत होते. चालक व वाहनांची संख्याही ३-३ अशी आहे.
नांदेडमधील सचखंड श्री हजुर साहेब परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक, विष्णुपुरी प्रकल्प, आकाशवाणी केंद्र, जुना मोंढा टॉवर तसेच मुख्य बाजारपेठा आणि गर्दीची ठिकाणे येथे दररोज तपासणी करणे या पथकाची जबाबदारी आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही जबाबदारी पार पाडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे समोर येत आहे.
मंजूर पदांमध्येही तीन पोलीस अमलदार कमी आहेत, एक कर्मचारी अन्यत्र काम करत असून केवळ वेतन या विभागातून घेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यरत कर्मचारी संख्या अत्यंत कमी राहिली आहे.दीर्घकाळापासून मनुष्यबळाच्या अभावातही अधिकारी व कर्मचारी झुंजारपणे काम करत असले तरी तातडीच्या सुरक्षा परिस्थितीत हे पथक प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकेल का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बीडीडीएस पथकातील रिक्त पदे तातडीने भरून काढावीत, अशी मागणी होत आहे. संवेदनशील जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेसाठी सक्षम आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत बॉम्ब शोधक व नाशक पथकाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या पूर्वी पण काही पोलीस अंमलदार नियुक्तीला बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात होते पण काम दुसऱ्याच जागी साहेबांच्या आदेशाने करीत होते.म्हणजे या विभागात असलेल्या जास्त वेतनाचा फायदा घेत होते आणि काम कमी जोखिमेचे करत होते. म्हणजे पहिले सुद्धा असेच होते कि मनुष्यबळाची कमतरता या विभागात नेहमीच राहायची.
