सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्वारातीम विद्यापीठ अंतर्गत हिवाळी – २०२५ परीक्षा सुरू

 

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिवाळी २०२५ पदवी परीक्षा आज, दि. ११ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाल्या आहेत. परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील एकूण १२४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीच्या सतत निगराणीखाली परीक्षा पार पडत आहेत.

विद्यापीठाशी संलग्न ४०५ महाविद्यालयांमधील सुमारे एक लाख वीस हजार विद्यार्थी विविध शाखांच्या परीक्षेत सहभागी झाले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान, मानव विज्ञान,वाणिज्य व व्यवस्थापन तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ या शाखांतील विविध विषयांच्या परीक्षा सुरू आहेत.

कॉपीमुक्त परीक्षा धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. विद्यापीठातील अधिष्ठाता आणि टेक्निकल टीममार्फत सर्व परीक्षा कक्षांमध्ये सुरू असलेल्या प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. निवडणुक आणि सुट्टीचे दिवस वगळता परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडत आहेत.

परीक्षेचा निकाल अचूक व वेळेवर जाहीर होण्यासाठी १०० केंद्रांवर संगणकीय पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांना तात्काळ व विश्वसनीय निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. चंद्रकांत बाविस्कर आणि डॉ. पराग खडके हे अनुक्रमे लातूर, परभणी (हिंगोली) व नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर देखरेख करीत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!