नांदेड,(प्रतिनिधी)- स्वतःला मोठी जहागीरदार असल्याच्या अविर्भावात माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पवार यांनी एका विद्युत विभागातील कंत्राटदाराला फोनवर अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून, कंत्राटदाराच्या तक्रारीवरून भारती पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील असा आहे की,सोमवारी सकाळी ११ वाजता कंत्राटदार बबन खराणे-पाटील यांना भारती पवार यांचा फोन आला. फोनवर त्यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत घाणेरड्या आणि अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ सुरू केली.फोनवरील संभाषणात त्यांनी म्हटले, “तुम्ही ओबीसीमध्ये मराठे भीक मागता,” असे वक्तव्य करत अनुसूचित जातीतील एका गटाचा देखील अपमान केला. यासोबतच, त्यांनी मराठा समाजाबद्दलही अत्यंत अवमानकारक भाषा वापरली.भारती पवार यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. तथापि, वीजपुरवठा हा वीज वितरण कंपनीच्या अखत्यारीत येणारा विषय असून, कंत्राटदार केवळ कंपनीने सांगितलेली कामेच पार पाडतो. तरीही भारती पवार यांनी कंत्राटदारास धमकी देत, “तुला त्या चौकात येऊन खाली पाडून मारेन,” असेही म्हणाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बबन खराणे यांनी स्पष्ट केले की, “माझा भारती पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. माझ्या मुलींपैकी एकीकडे विद्युत कंत्राटदार परवाना आहे. मी तिच्यासोबत काम करतो. पवार यांना माझे घर माहीत आहे, असे त्या सांगत होत्या पण मला त्यांच्या शेताची काही माहिती नाही.”या ऑडिओ क्लिपमध्ये वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद असून, मराठा समाजासोबतच इतर समाजगटांचेही भावना दुखावल्याचे चित्र आहे. भारती पवार यांचा एकंदर बोलण्याचा रोख असा होता की, लोकशाहीचा काहीही अर्थ उरलेला नाही, आणि त्या स्वतःला एखाद्या जहागीरदाराच्या थाटात संबोधत आहेत.
पोलीस कारवाई सुरू
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारती पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आरोपी महिला भारती पवार यांना अटक करण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे.” चितांबर कामठेवाड यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा व शांतता राखावी.मराठा समाजातील बांधवानी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रकरणात मराठा समाजाचे नाव घेऊन जाणीवपूर्वक शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी घेतलेली कारवाई ही समाजाच्या आत्मसन्मानासाठी गरजेची होती.हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, समाज, जात, आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणारा प्रकार आहे. या प्रकरणात कायदेशीर पातळीवर योग्य ती कारवाई होणे अत्यावश्यक असून, यामुळे इतर सार्वजनिक प्रतिनिधींनाही एक संदेश मिळेल की, सत्तेच्या माध्यमातून कोणीही मनमानी करू शकत नाही.
