नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत लिंबगाव पोलिसांनी सुगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, चार मोबाईल, तीन मोटारसायकली तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ₹2,12,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पण लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहटी या वाळू धक्क्यावरून होणारी वाळूची बेकायदा वाहतूक कधी बंद होणार हे सुद्धा पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी पाहायला हवे. कारण वाळूच्या व्यवसायात १५ टक्के खरा धंदा आणि ८५ टक्के खोटा धंदा सुरु असतो.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 12 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लिंबगाव पोलिसांच्या पथकाने सुगाव शिवारातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळील शेतात झाडाखाली सुरू असलेल्या अंदर-बाहेर या जुगारावर छापा टाकला. कारवाईदरम्यान सात आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत आरोपींकडून ₹9,200 रोख रक्कम, चार अँड्रॉइड मोबाईल, तीन मोटारसायकली आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील नागरिकांनी जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधातील कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सोबतच राहटी वाळू धक्क्यावर सुद्धा कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
