ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अमृतसर (पंजाब) येथून काही जण नांदेडमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार २० मे रोजी नांदेड-हिंगोली गेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ७२.०३ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर, एक स्कुटी आणि नोटा मोजण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये राजविंदर कौर जर्मनजितसिंग महाल (रा. अमृतसर, पंजाब), गुरमुखसिंग उर्फ गुरी सेवकसिंग गिल (रा. गुरुद्वारा गेट नं. ६, शाहिदपुरा, नांदेड), अमनप्रितसिंग उर्फ मनी जगजीतसिंग बेदी (रा. गुरुद्वारा गेट नं. २, नांदेड) आणि जगजीत उर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के (रा. बाबानगरवाडी, ता. जि. नांदेड) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख ६० हजार १५० रुपयांची ब्राऊन शुगर, १ लाख १० हजार रुपयांची स्कुटी तसेच नोटा मोजण्याचे मशीन यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वजीराबाद पोलीस करीत आहेत.
