नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची कारवाई; 1,955 आरोपींविरुद्ध गुन्हे, नोव्हेंबरमध्ये मोहिम-5 राबविणार नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-4 अंतर्गत ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 1 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांत एकूण 1,402 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 1,955 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये तब्बल 40 कोटी 69 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मोहिमेत गुटखा विक्रीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अन्वये 23 गुन्हे, महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 237 गुन्हे, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 858 गुन्हे, शस्त्र अधिनियमांतर्गत 37 गुन्हे, तर इतर अधिनियमांखाली 247 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मुद्देमाल जप्त चारही जिल्ह्यांतील कारवाईचा विचार करता नांदेड जिल्ह्यात 9 गुटखा, 58 जुगार, 240 दारूबंदी, 13 शस्त्र अधिनियम आणि 106 इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सुमारे 31.27 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परभणी जिल्ह्यात 2 गुटखा, 69 जुगार, 126 दारूबंदी, 6 शस्त्र अधिनियम आणि 26 इतर गुन्हे दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात 2 गुटखा, 47 जुगार, 326 दारूबंदी, 12 शस्त्र अधिनियम आणि 48 इतर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली. तर लातूर जिल्ह्यात 10 गुटखा, 63 जुगार, 166 दारूबंदी, 6 शस्त्र अधिनियम आणि 67 इतर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष पथकाचाही कारवाईत सहभाग पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यांत अवैध वाळू उपसा व वाहतूक, मटका, जुगार आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाया केल्या. या मोहिमेत विशेष पथकासह संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही समावेश आहे. 1 नोव्हेंबरपासून अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-5 ऑक्टोबर महिन्यातील मोहिमेनंतर 1 नोव्हेंबरपासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-5 राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत चारही जिल्ह्यांत गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ, अवैध वाळू उपसा व वाहतूक, वेश्याव्यवसाय, जीवनावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन तसेच अवैध प्रवासी वाहतूक यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. खबर हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून 9150100100 या मोबाईल क्रमांकावर ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर नागरिकांनी अवैध व्यवसायांबाबतची माहिती द्यावी आणि आपल्या परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 65 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळामुळे खचून जावू नका ; संकट काळात शासन बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे