स्वागताध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मांडली जातीय मानसिकतेची विदारक उदाहरणे नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय समाजात जातिव्यवस्था आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेचा अंत केल्याशिवाय खर्या अर्थाने सामाजिक क्रांती शक्य नाही. जातीयता निर्मूलनाची लढाई केवळ एका राजकीय पक्षाची किंवा संघटनेची मर्यादित चळवळ न राहता सर्व समविचारी पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन ती व्यापक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य जातीअंत संघर्ष समितीच्या दुसर्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष प्रवीण पाटील, माजी खा.रामचंद्र डोम, पॉलीट ब्युरो सदस्य कॉ.अशोक ढवळे, कॉ.विक्रम सिंग, कॉ.अजित नवले, कॉ.विजय गाभणे, कॉ.शैलेंद्र कांबळे, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, यांच्यासह विविध पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक देशातील ऐतिहासिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार सामंतशाहीचे स्वरूप वेगळे असते. सामंतशाहीचा अंत झाल्यानंतर जातिव्यवस्था आपोआप नष्ट होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण जातिव्यवस्थेची मुळे भारतीय समाजरचनेत खोलवर रुजलेली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.जात आणि वर्ग यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन भारतीय समाजाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. केवळ आर्थिक शोषणाच्या चौकटीत जातीय विषमतेचा प्रश्न समजून घेता येणार नाही. सामाजिक प्रतिष्ठा, सांस्कृतिक वर्चस्व आणि राजकीय सत्तेची रचना यांचाही विचार करावा लागेल. आंतरजातीय विवाह, सांस्कृतिक परिवर्तन आणि जातीय मानसिकतेत बदल घडवून आणणे ही जातिनिर्मूलनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पावले आहेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी श्रमांच्या स्वरूपात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वाधिक परिणाम वंचित आणि श्रमिक घटकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रज्ञान, भांडवलशाही, श्रमव्यवस्था आणि सामाजिक विषमता यांचा एकत्रित विचार करून परिवर्तनाची दिशा ठरवावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. जातीय निर्मूलनाची सुरुवात घरातूनच व्हावी : प्रवीण पाटील स्वागताध्यक्ष प्रवीण पाटील यांनी जातीयता निर्मूलनाचे आव्हान अत्यंत व्यापक असल्याचे सांगितले. केवळ भाषणे आणि अधिवेशनांमधून जातीयता संपणार नाही, तर प्रत्येकाने स्वतःच्या आचरणात बदल घडवून आणणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्त्यांची प्रामाणिकता, समर्पणाची भावना आणि सामाजिक संघर्षातील योगदानाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. लहान वयातच मुलांच्या मनात जातीय भेदभावाचे संस्कार रुजवले जात असल्याची ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर जातीयता कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात जातीयवाद कमी होण्याऐवजी वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीत उमेदवाराची गुणवत्ता आणि कार्यापेक्षा त्याची जात पाहून उमेदवारी देण्याची प्रवृत्ती जातीयवादाला बळ देत आहे. जातीयता निर्मूलनाची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. समता आणि बंधुतेची मूल्ये केवळ बोलण्यात नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारातही दिसली पाहिजेत. सर्व पुरोगामी आणि समविचारी शक्तींनी एकत्र येऊन ही चळवळ पुढे नेण्याचे आवाहन सीए डॉ.प्रविण पाटील यांनी केले. दुहेरी लढ्याची गरज-कॉ.अशोक ढवळे जातीअंताचा लढा लढतांना विषमता आणि सामाजिक स्थिती विरुद्ध प्रखर लढा द्यावा लागणार आहे. भांडवलशाहीतून शोषण आले आहे. जातीयता ही शोषणावर आधारीत असल्याने त्याविरुद्ध सामुहिक लढे उभारण्याची गरज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलीट ब्युरो सदस्य कॉ.अशोक ढवळे यांनी केले. यावेळी कॉ.अजित नवले, माजी खा.कॉ.डोम यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कॉ.उज्वला पडलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ.विजय गाभणे यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 160 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या चौफाळा येथे जलकुंभावरून पडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सुरक्षा कवचाचा अभाव, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी