जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र व जोशी हॉस्पिटलतर्फे जनजागृती कार्यक्रम नांदेड (प्रतिनिधी) – मानसिक आरोग्याबाबत समाजात आजही अनेक गैरसमज असून, ते दूर करण्यासाठी मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव समजून घेणे, त्यांचे म्हणणे सहानुभूतीने ऐकणे आणि त्यांना योग्य उपचारांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी यांनी केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र व जोशी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जोशी हॉस्पिटल येथे सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. आशिष तळणीकर, डॉ. प्रणद जोशी आणि डॉ. दि. भा. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रत्यक्ष अनुभवांचे महत्त्व : खरी मते, खरा बदल’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. जोशी म्हणाले की, आज जगभरात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढत असली, तरी या क्षेत्रात अद्याप अनेक आव्हाने आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकून घेणे आणि त्यांच्या भावनांना समजून घेणे, हा समाजातील सकारात्मक बदलाचा महत्त्वाचा मार्ग आहे. अशा व्यक्तींच्या व्यथा सहानुभूतीने समजून घेतल्याशिवाय मानसिक आरोग्याबाबतची सामाजिक दृष्टी बदलणार नाही. ‘मानसिक आजारांच्या जखमा दिसत नाहीत; पण त्यांची वेदना तितकीच खरी असते’, असे सांगत डॉ. जोशी यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, मानवी शरीराप्रमाणेच मन आणि मेंदूलाही आजार होऊ शकतात. शारीरिक आजारांची लक्षणे अनेकदा दिसून येतात; मात्र मानसिक आजारांच्या वेदना मनाच्या आत दडलेल्या असतात. त्यामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या व्यक्तींना समजून घेणे आणि त्यांना आधार देणे गरजेचे आहे. समाजात मानसिक आजारांविषयी आजही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. एखादी व्यक्ती नैराश्यात असेल किंवा तीव्र तणावाचा सामना करत असेल, तर तिला केवळ मनाची मरगळ आली आहे, असे समजणे चुकीचे आहे. नैराश्य, भीती आणि तीव्र तणाव या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मधुमेहासारख्या शारीरिक आजारांमध्ये जसे वैद्यकीय उपचारांची गरज असते, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्येही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि समुपदेशन महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. आजचे युग स्पर्धेचे असून तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे; मात्र माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब असल्याचेही डॉ. जोशी यांनी नमूद केले. मानसिक तणावातून जाणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्यांना भावनिक आधार देणे, यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आहे. मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करून संवेदनशील, सहानुभूतीपूर्ण आणि आधार देणारे वातावरण निर्माण करणे, हाच जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा खरा संदेश असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणी आणि लातूरमध्ये अवैध मटका व गुटख्यावर डीआयजी पथकाची मोठी कारवाई