ओळख बदलून धारणीच्या दुर्गम भागात राहत होता; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल २५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून अटक केली आहे. आरोपीने आपली मूळ ओळख लपवून बनावट नावाने वास्तव्य केले होते. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अपहरणाच्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. २००१ पासून पोलिसांना देत होता गुंगारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ मध्ये नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५६/२००१ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ आणि ३६६(अ) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश बबनराव देवकते (वय ४७, व्यवसाय मजुरी, मूळ रा. शिवाजीनगर, नांदेड) हा गुन्हा घडल्यानंतर पीडित मुलीसह फरार झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, आरोपी वारंवार आपली ओळख लपवून वास्तव्य करत असल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. तब्बल २५ वर्षे तो पोलिसांना चकवा देत होता. बनावट नावाने राहत असल्याचा खुलासा नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. सन २००१ मधील अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रकाश देवकते हा अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात पीडितेसह राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून पोलिसांच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील तलई कॅम्प, पोस्ट दिया येथे छापा टाकला. शोधमोहीम राबविल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपी प्रकाश बबनराव देवकते हा आपली खरी ओळख लपवून प्रकाश बलदेवसिंघ धानोपाल या नावाने राहत असल्याचे निष्पन्न झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून जुन्या गुन्ह्याच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ताब्यात घेतलेला इसम हाच २००१ मधील अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची खात्री झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई आरोपी आणि पीडितेला पुढील कायदेशीर तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे, नांदेड येथे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, पोलीस अंमलदार ज्ञानानंद लामतुरे, रामकुमार डोंगरे, विकी कालरा आणि महिला पोलीस अंमलदार हुबी शेख यांचा समावेश होता. २५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने नांदेड पोलिसांच्या या कारवाईची चर्चा होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्तृत्वाचा गौरव! माणिक बेंद्रे यांना गुणवत्ता पूर्ण सेवा पदक; नांदेड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मिंटो ब्रिजवर एल्गार! २ बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी सीपीत घुसले!