मुंबईच्या राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सन्मान; १९९५ पासूनच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवेला मानाची पावती, नांदेड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव! मुंबई (खास प्रतिनिधी) – पोलीस दलातील प्रदीर्घ, निष्ठावान आणि गुणवत्ता पूर्ण सेवेची दखल घेत नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांना सन २०२४ मध्ये जाहीर झालेले गुणवत्ता पूर्ण सेवेसाठीचे पदक प्रदान करण्यात आले. मुंबई येथील राजभवनात ९ ऑक्टोबर रोजी आयोजित दिमाखदार समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. बेद्रे यांच्या कार्याची दखल घेणारा हा गौरव नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरला आहे. राजभवनात पार पडलेल्या या भव्य समारंभात सन २०२२ ते २०२४ या कालावधीत जाहीर झालेल्या शौर्यपदकांसह गुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि उल्लेखनीय सेवा पदकांचे वितरण करण्यात आले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या विनंतीनुसार राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते विविध श्रेणींतील १०३ पदकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. या समारंभात पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांचाही सन्मान करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी त्यांना सहकुटुंब मुंबई येथे आमंत्रित करण्यात आले होते. तीन दशकांच्या सेवाप्रवासाला मानाचा मुजरा! माणिक बेंद्रे यांनी सन १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहत त्यांनी आपल्या अनुभवाची, कर्तव्यनिष्ठेची आणि प्रशासकीय कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. नागपूर, गडचिरोली येथील नक्षलवादविरोधी अभियान, किनवट, कोल्हापूर जिल्हा, परभणी येथील महामार्ग पोलीस, दहशतवादविरोधी पथक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुणे शाखा,जनसंपर्क विभाग अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चार वर्षे, तर संबंधित दहशतवादविरोधी पथकात आठ वर्षे काम करताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाप्रवासात अनुभव, शिस्त, जबाबदारी आणि जनसेवेप्रती बांधिलकी यांचा संगम पाहायला मिळतो. पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर कर्तृत्वाची मोहोर बेद्रे यांना सन २००९ मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी, सन २०१३ मध्ये पोलीस निरीक्षकपदी आणि सन २०२५ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली. पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यासोबत त्यांनी अधिक व्यापक जबाबदाऱ्या स्वीकारल्या. विविध विभागांतील अनुभवाच्या बळावर त्यांनी आपल्या सेवाकार्यात सातत्य राखले. प्रदीर्घ सेवाकाळात बजावलेल्या गुणवत्ता कामगिरीची शासनस्तरावर दखल घेत त्यांना प्रदान करण्यात आलेले हे पदक म्हणजे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि सेवाभावाचा गौरव आहे. हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नसून, पोलीस दलातील समर्पित सेवा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव मानला जात आहे. नांदेड पोलीस दलाकडून अभिनंदनाचा वर्षाव माणिक बेद्रे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे, जगदीश भंडरवार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. उल्लेखनीय सेवेसाठी मिळालेल्या या पदकामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. माणिक बेद्रे यांच्या या यशामुळे पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळणार असून, सेवाभावाने कार्यरत राहण्याचा संदेशही अधोरेखित झाला आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराकडून पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांचे या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-10-at-08.15.03.mp4 Kanthak Suryatal Post Views: 127 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विमानात घुसून कारवाई! लोकशाहीची हत्या की सत्तेचा खौफ? जाणून घ्या दिल्ली विमानतळावर नक्की काय घडले!