पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचा विद्यार्थ्यांना इशारा; एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती नांदेड (प्रतिनिधी) – सायबर सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सावधानता आणि जागरूकता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे, असा स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण संदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या विस्तारासोबतच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असल्याने विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना कमालीची दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम,माजी प्राचार्या गीता लाटकर यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती महिन्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथे विशेष सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच सुमारे ३०० विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ. नीलाभ रोहन यांनी सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींवर प्रकाश टाकला. OTP, PIN, CVV, पासवर्ड, बँक खात्याची माहिती अथवा कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेले फोन, संदेश, ई-मेल अथवा संशयास्पद लिंक याबाबत सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः UPI फसवणूक, KYC अपडेटच्या नावाखाली होणारे सायबर गुन्हे, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक, फेक कॉल, सोशल मीडिया फसवणूक तसेच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणारी ऑनलाइन आर्थिक फसवणूक यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्यावरही यावेळी भर देण्यात आला. सायबर फसवणुकीला बळी पडल्यास घाबरून न जाता तातडीने १९३० या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून पोलिसांशी संवाद साधला. राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यानिमित्त नागरिक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 22 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त जनसंवाद मधून पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद; ५५ तक्रारींची दखल