पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये तक्रारदारांचे प्रश्न ऐकून घेतले; संवेदना प्रणालीद्वारे तक्रारींच्या कार्यवाहीवर होणार देखरेख लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने आणि तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी लातूर येथे जनसंवाद उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या संवादादरम्यान तब्बल ५५ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, सायबर फसवणूक, पोलीस संरक्षणाची मागणी, कौटुंबिक वाद, जिवे मारण्याच्या धमक्या यांसह विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. तक्रारींच्या पाठपुराव्यासाठी संवेदना प्रणाली नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे प्रभावी आणि वेळेत निराकरण व्हावे, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने यापूर्वीच संवेदना तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जनसंवाद उपक्रमादरम्यान प्राप्त झालेल्या सर्व ५५ अर्जांची या प्रणालीद्वारे नोंद करून ते पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ तक्रारी स्वीकारून थांबण्याऐवजी त्यावर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली, याचा नियमित पाठपुरावा आणि आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रक्रियेला अधिक परिणामकारक आणि उत्तरदायी स्वरूप मिळणार आहे. नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिकांमधील संवादाची दरी कमी करून विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेणे, त्यावर तातडीने कार्यवाही करणे आणि त्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लोकाभिमुख पोलीसिंगला अधिक बळ देण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सावधानता आणि जागरूकताच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग- डॉ.नीलाभ रोहन एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड