बहीण ग्रामसेवक, भाऊ माध्यमिक शिक्षक; दत्ता वानोळे यांची पेसा अंतर्गत अमरावती विभागात निवड किनवट (प्रतिनिधी) – ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत सोनवाडी येथील दत्ता रघुनाथराव वानोळे यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पेसा अंतर्गत अमरावती विभागात माध्यमिक शिक्षकपदी त्यांची निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे वानोळे कुटुंबासह सोनवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दत्ता वानोळे यांनी प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता शिक्षण आणि मेहनतीच्या बळावर आपल्या यशाची वाटचाल केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून सिद्ध केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा, कुपटी बु., सहस्रकुंड येथे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण व आदिवासी भागातील मर्यादित शैक्षणिक सुविधा आणि विविध अडचणींचा सामना करत त्यांनी अभ्यासातील सातत्य कधीही खंडित होऊ दिले नाही. मेहनत, चिकाटी आणि ध्येयावर असलेला विश्वास यांच्या जोरावर त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. बहीण ग्रामसेवक, भाऊ शिक्षक वानोळे कुटुंबाच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दत्ता वानोळे यांच्या भगिनी जयश्री रघुनाथराव वानोळे या ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. आता दत्ता वानोळे यांची माध्यमिक शिक्षकपदी निवड झाल्याने बहीण ग्रामसेवक, भाऊ शिक्षक अशी या भावंडांची प्रेरणादायी ओळख निर्माण झाली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या भावंडांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. त्यांचे हे यश ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. दत्ता वानोळे यांच्या निवडीची माहिती मिळताच त्यांच्या अभिनंदनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. इस्लापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधवर साहेब यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दत्ता वानोळे यांचा सत्कार केला आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. सरपंच तुकाराम पाटील लोखंडे, महेश जाधव, शंकर गव्हांडे, लक्ष्मण सूर्यवंशी, जाधव पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या संघर्षाचे आणि मिळवलेल्या यशाचे कौतुक करत अभिनंदन केले.ज्या जिल्हा परिषद शाळेत आणि आश्रमशाळेत दत्ता वानोळे यांच्या शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी झाली, त्याच शिक्षणाच्या बळावर त्यांनी आता शिक्षकाची प्रतिष्ठित जबाबदारी मिळवली आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास संकटांवर मात करून कर्तृत्वाने उभे राहण्याचा आदर्श ठरला आहे. दत्ता रघुनाथराव वानोळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सोनवाडी परिसरातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. Kanthak Suryatal Post Views: 376 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा