अर्धापूर (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून कंबरेवर व मांडीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना अर्धापूर येथील स्वराज्य पानटपरी, तामसा टी-पॉईंट परिसरात २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शाहिद शेख चांद, शेख शमी शेख महमद आणि शेख मुरीद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीचे मित्र हाफिज मकसूद पिंजारी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कंबरेवर व मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर इसरार अहमद शेख नसीर (वय ३०, रा. अक्सा कॉलनी, अर्धापूर) यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ४७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १०९(१), २५२, ११८(२)(३)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर करीत आहेत. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
