ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीमुळे नांदेड शहरातील वाहतुकीत बदल
नांदेड (प्रतिनिधी) – ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त नांदेड शहरातून 26 ऑगस्ट रोजी पारंपरिक मिरवणूक (जुलूस) काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नांदेड पोलिस प्रशासनाने शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
पोलिस प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार बर्की चौक ते जुना मोंढा, जुना मोंढा ते वर्कशॉप कॉर्नर, महाराज पुतळा–वजिराबाद चौक–कलामंदिर तसेच सिडको/हडकोकडून जुना मोंढ्याकडे येणाऱ्या काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रविनगर, जुना कौठा आणि वर्कशॉप परिसरातील वाहतुकीवरही निर्बंध राहणार आहेत.
वाहतूक बंद असलेल्या मार्गांऐवजी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बर्की चौक–जुना मोंढा मार्गासाठी इतवारा बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, भंगार लाईन, गिट्टी क्रेशर चौक आणि बाफना टी पॉईंट रोडचा वापर करता येणार आहे. जुना मोंढा–वर्कशॉप मार्गासाठी अचल नगर, यात्री निवास, अण्णाभाऊ साठे चौक, महादेव दाल मिल व रोड क्रमांक 26 तसेच नाईक चौक–टिळक नगर चौक–पीरबुर्हान–चैतन्यनगर मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे.
वजिराबाद चौक–श्रीनगर मार्गावरील वाहतुकीसाठी वजिराबाद चौक, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) आणि गणेशनगर वाय पॉईंट हा पर्यायी मार्ग राहणार आहे. रविनगर/जुना कौठा ते वर्कशॉपसाठी गोवर्धनघाट पूल, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर आणि गणेशनगर वाय पॉईंट मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुना मोंढा ते सिडको/हडको जाणाऱ्या वाहनांसाठी भगतसिंग रोड, कविता हॉटेल, बाफना, देगलूर नाका आणि जुना पूल हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी बंद असलेल्या मार्गांवर जाण्याचे टाळून पोलिस प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्व वाहनचालक व नागरिकांनी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 या कालावधीत वाहतूक नियमनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक, डॉ.नीलाभ रोहन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
