नांदेड (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाच्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा देऊन हिंदू धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसनजीत वाघमारे, अब्दुल गफार, मुन्ना अब्बास, विठ्ठल पावडे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता मधील कलम 299, 302 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या FIR नुसार, तक्रारदार गणेश ओमप्रकाश कोकुलवार (वय 44), रा. राहणार चौफाळा, नांदेड, हे मार्केट यार्ड येथील पीएमआय एजंट असून हिंदू विश्व परिषद, नांदेड जिल्हा महामंत्री असल्याचे नमूद आहे. त्यांनी 24 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5.40 ते 6.50 वाजेच्या दरम्यान नांदेड येथील आयटीआय चौकात काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी कथितरीत्या सनातन धर्म मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद अशा घोषणा दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घोषणांचा व्हिडिओ फेसबुकवर पाहिल्याने आपल्या हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित घोषणा देणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तक्रारदाराचा जबाब शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मराठीत टंकलिखित करून घेण्यात आला असून, तो वाचून पाहिल्यानंतर बरोबर असल्याचे त्यांनी मान्य केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.03 वाजता FIR क्रमांक 0370/2026 नोंदविला. गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक राजेश अशोकराव पुरी यांच्याकडे देण्यात आली आहे. FIR मध्ये घटनेचे ठिकाण आयटीआय चौक, नांदेड असून ते शिवाजीनगर पोलिस ठाण्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याचे नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची चौकशी पोलिसांकडून सुरू असून, घोषणांचा नेमका संदर्भ, व्हिडिओची सत्यता आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे आता लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,093 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड -मुंबई विमानसेवा परत बंद शिंदे सेनेच्या उद्योग मंत्राचा कटकारस्थान;ठाकरे सेनेचा आरोप. ८.७५ कोटी तरुण ना शिकत आहेत ना काम करत आहेत!