नांदेड (प्रतिनिधी) – गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय, नांदेड रोड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १०० बाटल्या कोडीन फॉस्फेट व ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराइड असलेले औषधी सिरप, दोन मोबाईल व एक स्कूटर असा एकूण सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आरोपींमध्ये धर्माजी भिवा दुधाडे (वय ३५, रा. बालाजीनगर, हिंगोली नाका, मूळ गाव आमदरी, ता. भोकर) व मोहमद मुनवर (वय २३, रा. तुराब उल हक नगर, दर्गा रोड, परभणी) यांचा समावेश आहे.
आरोपी व्यावसायिक लाभासाठी परवान्याशिवाय हे मादक सिरप विक्री व खरेदी करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी एमएच-२६-सीएम-५६६६ क्रमांकाची स्कूटी (किंमत ७०,००० रु.), १०० सिरपच्या बाटल्या (किंमत ५०,००० रु.) व दोन मोबाईल (किंमत २०,००० रु.) असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याचे कलम ८(क), २१, २२(ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कोरंटलू (मो. ९७६३७०१५४०) करीत आहेत.
