नांदेड विभागाकडून पाणी गुणवत्तेचे कठोर निकष कायम; रेल्वे स्थानके व वसाहतींमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी नियमित तपासणी

नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतापूर्ण खाद्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. कॅग अहवालातील निरीक्षणांमध्ये नांदेड विभागातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर दूषित पाणी आढळल्याचे नमूद झालेले नाही. त्यामुळे विभागाकडून नियमितपणे करण्यात येणारी पाणी गुणवत्ता तपासणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे स्पष्ट होते.

नांदेड विभागात विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये 09 आरोग्य निरीक्षकांचे समर्पित पथक कार्यरत आहे. रेल्वे वैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य निरीक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी गुणवत्ता आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेची नियमितपणे पाहणी करतात. प्रस्थापित आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेअंतर्गत पाण्याचे नमुने नियमितपणे घेऊन जैविक परीक्षण, अवशिष्ट क्लोरीन तपासणी आणि रासायनिक विश्लेषण केले जाते. तसेच रेल्वे स्थानकांवरील कॅन्टीन, पॅन्ट्री कार आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून पॅकबंद खाद्यपदार्थ तसेच कच्च्या मालासह खाद्यपदार्थांचे नमुनेही वेळोवेळी घेऊन निर्धारित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात.

गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर नमुने घेऊन त्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये :

* 1,029  पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी
* 22,365 नमुन्यांची अवशिष्ट क्लोरीन तपासणी
* 112 नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण
* 91 खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी

महत्त्वाचे म्हणजे, या कालावधीत तपासणी करण्यात आलेल्या एकाही पाण्याच्या नमुन्यात असमाधानकारक गुणवत्ता आढळून आलेली नाही. यावरून विभागात सातत्याने राबविण्यात येत असलेल्या पाणी गुणवत्ता निरीक्षण आणि नियंत्रण उपाययोजनांची प्रभावीता दिसून येते. आरोग्य निरीक्षक तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये नियमितपणे तपासणी व नमुने संकलित करतात. त्यामुळे केवळ विशेष मोहिमांपुरती मर्यादित न राहता पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवली जाते.

उपाययोजना अधिक बळकट

कॅग अहवालातील निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाने आपल्या निरीक्षण व तपासणी यंत्रणेला आणखी बळकटी दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना नियमित नमुने संकलित करण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे, नमुने निर्धारित प्रयोगशाळांमध्ये वेळेत पाठविणे तसेच रेल्वे परिसरात उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याची आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता बारकाईने तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवरील कॅन्टीन, पॅन्ट्री कार आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून, खाद्यपदार्थ, कच्चा माल, स्वच्छतेच्या पद्धती आणि एकूणच परिसरातील स्वच्छतेची नियमित तपासणी केली जात आहे.

नांदेड विभाग प्रवासी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतापूर्ण खाद्यपदार्थ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. पाणी व खाद्यपदार्थांची सातत्यपूर्ण तपासणी आणि निरीक्षणाची ही यंत्रणा सार्वजनिक आरोग्य आणि प्रवासी समाधानाबाबत विभागाचा सक्रिय आणि प्रतिबंधात्मक दृष्टिकोन दर्शविते. नांदेड विभाग आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत या उपाययोजना अधिक बळकट करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!