नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या वादातून, पैशांच्या व्यवहारातून आणि कौटुंबिक वादातून या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहिली घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री शंकरराव चव्हाण महाविद्यालय परिसरात घडली. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या पुतण्यावर चाकूने मान व पोटावर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोउपनि. चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना उस्माननगर शेतशिवारात घडली. पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपी सतीश सटवाजी डोणपले याने फिर्यादी शाहेफ खान शमशोदी खान यांना दुचाकीवरून नेत कॅनॉलमध्ये ढकलून खंजीराने वार करत खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनि. सूर्यवंशी करीत आहेत. तिसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेबूबनगर येथे घडली. फिर्यादीच्या पुतण्याला मारहाण का केली, अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून समीर, सलमान सलाउद्दीन, शेख हातीम शेख मोईन व अन्य एका आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीवर लोखंडी वस्तू व धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी बीएनएस तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अधिकारी चव्हाण करीत आहेत. तीन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,086 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई; 10 गोवंशांची सुटका, 31.51 लाखांचा मुद्देमाल जप्त व्यक्तिगत फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा