हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ११:२६ वाजता भूकंपासोबत जमिनीखालून गडगडाटासारखा आवाजही ऐकू आल्याची माहिती नागरिकांनी दिली. भूकंप मापन केंद्राच्या प्राथमिक माहितीनुसार, या धक्क्याची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदविण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई परिसरात असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के वसईसह, हिंगणी, दुर्ग धामणी, येडुद , कंजरा, जामगव्हाण, लावा आणि आसपासच्या गावांमध्ये जाणवले. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिक काही काळ घराबाहेर आले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे, गुरुवारी मध्यरात्री हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत लागोपाठ चार भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपानंतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील घडामोडींवर सतत नजर ठेवण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 912 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation थलापती विजय – एक कॉर्पोरेट स्टाईल मुख्यमंत्री नांदेड: वजीराबाद पोलीस ठाण्यातील दोन फरार आरोपींविरुद्ध जनतेने माहिती द्यावी