लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन सराईत आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १२ लाख ३५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील एका चोरीच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १ ऑगस्ट रोजी दोन स्वतंत्र कारवाया करून ही यशस्वी कामगिरी केली. पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून योगेश शंकर पवार (वय ४३, मूळ रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडी तसेच कर्नाटकातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट आणि अन्य भागांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या चौकशीतून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ आणि कर्नाटकातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ असे एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. पोलीसांनी आरोपींकडून ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख १५ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १२ लाख ३५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट तसेच चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे आणि रोख रकमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, जप्त केलेला मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, तसेच पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे आणि सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 577 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जळकोटमध्ये अवैध जुगारावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; ९ आरोपींना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड, तीन आरोपी जेरबंद;विमानतळ पोलिसांची कार्यवाही