माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना खुले पत्र

विषय : सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियम, 1956 कायम ठेवून प्रस्तावित नवीन कायद्याचा पुनर्विचार करण्याबाबत नम्र कळकळीची विनंती

मा. मुख्यमंत्री महोदय,

सप्रेम नमस्कार.

सर्वप्रथम, शीख धर्म, शीख गुरु आणि त्यांच्या महान बलिदानांबद्दल आपल्या मनात असलेली श्रद्धा आणि आदरभाव यासाठी संपूर्ण शीख समाज आपल्या प्रती मनःपूर्वक कृतज्ञ आहे. श्री गुरु तेग बहादुर जी यांनी धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आणि शीख गुरुंनी भारताची संस्कृती, स्वाभिमान आणि मानवतेच्या रक्षणासाठी केलेले अतुलनीय कार्य आपण नेहमीच सन्मानाने स्मरण केले आहे.

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन शासनाने सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डावर जबरदस्तीने लादलेले ६१ कोटी रुपयांचे कर्ज कोणताही विलंब न लावता माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड आर्थिक संकटातून मुक्त झाला आणि लाखो शीख बांधवांच्या मनात आपल्या विषयीचा आदर अधिक दृढ झाला. हा निर्णय केवळ आर्थिक मदत नव्हता, तर शीख समाजाच्या धार्मिक भावनांचा केलेला सन्मान होता. या ऐतिहासिक कार्याबद्दल संपूर्ण शीख समाज सदैव आपला ऋणी राहील.

तसेच, महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या शहीदी पर्वाचे राज्यभर भव्य आयोजन करणे आणि त्यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, हा आपल्या नेतृत्वाखाली झालेला ऐतिहासिक निर्णय आहे. या कार्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात आपले नाव कायम आदराने घेतले जाईल.

महोदय,

आपण एक कुशल प्रशासक, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि चाणक्यनीतीचा योग्य वापर करणारे राजकारणी आहात. म्हणूनच अत्यंत नम्रतेने एक विनंती करू इच्छितो की, राजकीय किंवा प्रशासकीय धोरणे धार्मिक संस्थांवर लागू करताना त्या संस्थेच्या परंपरा, श्रद्धा आणि धार्मिक मर्यादांचा अत्यंत संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे.

सन २०१५ मध्ये सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियमातील कलम ११ मध्ये बदल करून सरकारी अध्यक्ष नेमण्याची तरतूद करण्यात आली. आता संपूर्ण सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियम, १९५६ रद्द करून नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हा विषय स्थानिक शीख समाजासाठी अत्यंत वेदनादायी आणि चिंतेचा आहे.

महोदय, आणखी एक ऐतिहासिक वास्तव नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मराठवाड्यातील स्थानिक शीख समाज हा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सचखंड श्री हजूर साहिबच्या धार्मिक मर्यादा, परंपरा, सेवा आणि व्यवस्थापनाचे रक्षण करण्यासाठी येथील स्थानिक शीख समाजाने अनेक पिढ्यांपासून निःस्वार्थ सेवा केली आहे. या पवित्र परंपरा जपण्यासाठी स्थानिक शीख समाजाने संघर्ष, त्याग आणि प्रसंगी बलिदानही दिले आहे. त्यामुळे या गुरुघराच्या संरक्षणामागे स्थानिक समाजाचे योगदान इतिहास कधीही विसरू शकणार नाही.

महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वास्तव्यास असलेले अनेक शीख बांधव विविध ऐतिहासिक परिस्थितींमध्ये भारतातील इतर राज्यांतून महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या श्रद्धेबद्दल कोणताही प्रश्न नाही. मात्र सचखंड श्री हजूर साहिबच्या साडेतीनशे वर्षांच्या विशिष्ट धार्मिक परंपरा, मर्यादा, सेवा आणि व्यवस्थापनाचा सातत्यपूर्ण अनुभव स्थानिक शीख समाजालाच लाभलेला आहे. म्हणून या गुरुघराच्या व्यवस्थापनात स्थानिक शीख समाजाची भूमिका अनन्यसाधारण राहणे आवश्यक आहे.

गुरुद्वाऱ्याची सेवा ही केवळ बैठका घेऊन चालणारी व्यवस्था नसून ती चोवीस तास अखंड सुरू असणारी धार्मिक जबाबदारी आहे. स्थानिक शीख समाज गुरुघराशी भावनिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेला असल्यामुळे दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कोणत्याही क्षणी सेवेसाठी उपलब्ध राहू शकतो. परंतु दूरवर राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भौगोलिक अंतरामुळे प्रत्यक्ष सेवेसाठी आवश्यक तेवढा वेळ देणे व्यवहार्यदृष्ट्या कठीण ठरू शकते.

जर स्थानिक धार्मिक परंपरा, ऐतिहासिक वास्तव आणि गुरुघराच्या विशिष्ट मर्यादांचा पुरेसा विचार न करता नवीन कायदा लागू करण्यात आला, तर भविष्यात व्यवस्थापनासंदर्भात मतभेद, वाद आणि अनावश्यक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गुरुघर हे समाजाला जोडणारे केंद्र आहे; ते वादाचे कारण बनू नये, हीच प्रत्येक शीखाची भावना आहे.

म्हणून आपणास नम्र विनंती आहे की—

– सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड अधिनियम, १९५६ रद्द करू नये.
– अधिनियमात काही त्रुटी असल्यास स्थानिक शीख समाज, पंज प्यारे साहिबान, धार्मिक विद्वान आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात.
– गुरुद्वाऱ्याचा प्रबंध केवळ लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या स्थानिक शीख प्रतिनिधींमार्फतच चालविण्याची व्यवस्था कायम ठेवावी.
– गुरुद्वाऱ्याच्या धार्मिक परंपरा, मर्यादा, सेवा आणि स्वतंत्र धार्मिक ओळख अबाधित राहील, याची शासनाने स्पष्ट हमी द्यावी.

महोदय,

धार्मिक श्रद्धास्थानांवरील निर्णय केवळ प्रशासकीय निकषांवर नव्हे, तर श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा सन्मान राखून घेतले गेले पाहिजेत.

आपल्या न्यायप्रिय नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आपण या विषयात तातडीने हस्तक्षेप करून प्रस्तावित नवीन कायद्याला स्थगिती द्यावी आणि स्थानिक शीख समाज, पंज प्यारे साहिबान, धार्मिक विद्वान व सर्व संबंधित घटकांशी प्रत्यक्ष चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढावा, हीच संपूर्ण शीख समाजाची कळकळीची अपेक्षा आहे.

आपण आज घेतलेला निर्णय हा केवळ एका कायद्याचा निर्णय ठरणार नाही, तर भविष्यातील पिढ्या महाराष्ट्र शासनाने शीख समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचा किती सन्मान केला याचेही मोजमाप ठरेल. आम्हाला विश्वास आहे की आपण संवाद, न्याय आणि संवेदनशीलतेचा मार्ग स्वीकाराल.

वाहेगुरू जी आपणास सद्बुद्धी, उत्तम आरोग्य आणि न्यायपूर्ण निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करो, हीच अरदास.

आपला शुभचिंतक

राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!