नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घडलेली शेख शमीम शेख इसाक (वय 42, रा. खडकपुरा, नांदेड) यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी, संवेदनशील आणि चिंताजनक मानली जात आहे. कोणतेही मतभेद, वाद किंवा पार्श्वभूमी असली तरी कायदा हातात घेऊन एखाद्याचा जीव घेणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय असू शकत नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राप्त माहितीनुसार, 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर सुमारे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान शेख शमीम शेख इसाक हे आपल्या एका मित्रासोबत वाघी रस्त्यावरील एका पान टपरी जवळ ओट्यावर बसले होते. त्याचवेळी काही दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन दर्गाह चा पत्ता विचारल्याचे सांगितले जात आहे. शेख शमीम हे पत्ता सांगत असतानाच त्यांच्या मित्राच्या नजरेस हल्लेखोर याकडे पिस्तूल असल्याचे दिसले. परिस्थितीची जाणीव होताच सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याआधीच हल्लेखोरांनी शेख शमीम यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी गोळीबार झाल्याचे संकेत देणारे पुरावे आढळल्याची चर्चा असून तेथे गोळ्यांचे खोके सापडल्याचेही सांगितले जात आहे. तथापि, या बाबत अधिकृत पुष्टी तपास यंत्रणांकडून होणे अपेक्षित आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, अतुल भोसले तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांची ओळख अद्याप समोर आलेली नसली तरी पोलीस तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शहरात पुन्हा अशा प्रकारच्या कठोर आणि धक्कादायक गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या हत्येमागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा उलगडा तपासातून होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेडमध्ये संघटित गुन्हेगारी किंवा माफिया प्रवृत्ती डोके वर काढत आहेत का, हा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे. पोलीस तपासानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे या खुनामागे केवळ वैयक्तिक वैर नसून मोठे कटकारस्थान, गुप्त खलबते आणि पूर्वनियोजित षड्यंत्र दडलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शमीम नेमका कुठे बसला आहे, त्याचे ठिकाण मारेकऱ्यांना कसे समजले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ही घटना रात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अशा वेळी तो घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी असल्याची माहिती मारेकऱ्यांपर्यंत कशी पोहोचली? यावरून त्याच्या हालचालींवर कुणाचे तरी बारीक लक्ष होते, असा संशय बळावतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे कुणाचे तरी गुप्त खलबत, नियोजनबद्ध डावपेच, संगनमत, सूत्रधारांचे जाळे आणि पूर्वनियोजित कट कार्यरत असल्याची शक्यता अधिक गडद होत आहे. तपासातून या खलबतामागील खरे चेहरे आणि त्यामागील हेतू उघड होणे आवश्यक आहे. Kanthak Suryatal Post Views: 3,960 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेची २.१० लाखांची खंडणी इतवारा पोलीस ठाण्यातील तारा परभणीकडे रवाना; आता ख्यातीच्या गादीवर कोण?