पोचमपाड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी कृती समिती आक्रमक
नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी कृती समिती आता आक्रमक झाली असून, तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तब्बल ९० ते १०० किलोमीटरचा प्रवास करून शेकडो शेतकरी दुचाकींसह नांदेडमध्ये दाखल झाले.
पोचमपाड धरणाच्या फुगवट्यामुळे धर्माबाद तालुक्यासह परिसरातील शेकडो एकर शेती दरवर्षी पाण्याखाली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि मागण्या करूनही शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत किंवा कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत”, “धरणग्रस्तांना न्याय द्या”, “बॅक वॉटरग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. जिल्हा शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, पोचमपाड धरणग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई, पुनर्वसन आणि कायमस्वरूपी तोडगा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. “आजची रॅली हा फक्त ट्रेलर आहे. शासनाने मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. यामध्ये बॅक वॉटरमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे, कायमस्वरूपी संरक्षण भिंत उभारणे, शेतीचे सर्वेक्षण करून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे आदी मागण्यांचा समावेश होता. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष पुन्हा एकदा पोचमपाड धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे वेधले गेले असून, शासन आता यावर कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
