नांदेड – नांदेड जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी नागरी समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त आशिष सुरेखा दिलीप ढवळे यांनी केले आहे. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि उज्ज्वल भविष्यासाठीची तयारी. मात्र आजही अनेक मुले हॉटेल, गॅरेज, बांधकाम साईट, दुकाने आणि घरगुती कामांमध्ये गुंतलेली दिसतात. ही परिस्थिती समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बालकामगार ही केवळ आर्थिक समस्या नसून ती एक गंभीर सामाजिक अन्यायाची बाब आहे. गरिबी, पालकांचे अशिक्षण, स्थलांतर आणि स्वस्त मजुरीची मागणी ही यामागील प्रमुख कारणे आहेत. काही नियोक्ते कमी मजुरीत जास्त काम करून घेण्यासाठी मुलांचा गैरफायदा घेतात, जे कायद्याने दंडनीय आहे. भारत सरकारच्या बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 नुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवण्यास बंदी आहे. तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास सक्त मनाई आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. नांदेड जिल्ह्यात कामगार विभाग, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बालकामगार विरोधी मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये छापे, जनजागृती अभियान आणि बालकांचे पुनर्वसन यावर विशेष भर दिला जात आहे. बालकामगार निर्मूलन ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सजग नागरिक म्हणून आपण पुढीलप्रमाणे सहकार्य करावे: * 14 वर्षाखालील बालक काम करताना किंवा 14 ते 18 वयोगटातील बालक धोकादायक कामात गुंतलेले आढळल्यास त्वरित कळवा * चाइल्ड हेल्पलाइन: 1098 * सहायक कामगार आयुक्त कार्यालय, उद्योग भवन, शिवाजी नगर, नांदेड येथे तक्रार नोंदवा * आपल्या परिसरातील बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांना विरोध करा * पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करा लहान हातात काम नाही, शिक्षणाचीच ओळख पाहिजे. Kanthak Suryatal Post Views: 618 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी 4 मेपर्यत नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन ; महिला मधपाळासाठी एक पुरस्कार राखीव