नांदेड – खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 कृषी सेवाकेंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी शुक्रवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीनंतर ही कारवाई केली.
जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत अनेक घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांकडे गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यांचे खुलासे असमाधानकारक आढळल्याने व नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
तपासणीत ई-पॉस प्रणालीतील अनियमितता, कंपनीकडून मिळालेल्या Acknowledgement ची वेळेत नोंद न करणे, तसेच ई-पॉस साठ्यात तफावत आढळली. याशिवाय दुकानांमध्ये भाव फलक व साठा फलक अद्ययावत नसणे, दैनंदिन अभिलेख न ठेवणे, नोंदवही व बिलांमधील त्रुटी, ‘एन’ फॉर्मनुसार साठा रजिस्टर न ठेवणे, तसेच शेतकऱ्यांना ‘एम’ फॉर्मनुसार पावत्या न देणे आणि खरेदी बिलांवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, काही कृषि सेवा केन्द्रात 20 पेक्षा जास्त रासायनिक खताच्या बॅगचे वितरण एकाच शेतकऱ्यांना करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आले. या त्रुटी प्रकरणी संबंधित केंद्र चालकांना नोटिसा बजावून प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. मात्र त्यांचे खुलासे असमाधानकारक आढळल्याने व नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्या केंद्रांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असे सांगीतले आहे.
शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन
* अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत.
* खरेदीचे पक्के बिल आवर्जून घ्यावे.
* खते खरेदी करताना ‘फार्मर आयडी’ चा वापर करावा.
* फसवणूक किंवा नियमभंग आढळल्यास कृषि अधिकारी (गुनि) तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
निलंबित कृषि सेवा केंद्र
* ज्ञानेश्वर कृषि सेवा केंद्र बिलोली,
* गजानन ॲग्रो एजन्सी हदगाव,
* धनश्री ट्रेडिंग कंपनी कंधार,
* न्यु श्रध्दा कृषि सेवा केंद्र पेठवडज ता.कंधार
* माऊली कृषि सेवा केंद्र जांब ता.मुखेड,
* श्रीराम कृषि सेवा केंद्र बाऱ्हाळी ता.मुखेड,
* तिरुपती ट्रेडर्स,माळकौठा ता.मुदखेड.
* कैलास कृषि सेवा केंद्र मुक्रमाबाद ता.मुखेड
* ज्ञानेश्वरी कृषि सेवा केंद्र मुखेड,
* शिल्पा कृषि सेवा केंद्र हिमायतनगर,
* समृध्दी बीज भांडार हिमायतनगर,
* बालाजी फर्टीलायझर्स कारेगाव, ता.धर्माबाद.
* व्यंकटेश कृषि सेवा केंद्र करडखेड, ता.देगलूर.
* सचिन कृषि सेवा केंद्र,माळेगाव, ता.देगलूर.
* श्री साई कृषि सेवा केंद्र घुंगराळा,ता.नायगाव.
* व्यंकटेश्वरा कृषि सेवा केंद्र बारुळ, ता.कंधार.
कृषी केंद्रांवर कारवाई; पण खत घोटाळ्याचे मूळ मात्र घाऊक विक्रेत्यांकडेच?
खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येत असली तरी या कारवाईची दिशा योग्य आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सध्या सुरू असलेल्या धडक मोहिमेत प्रामुख्याने किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र खत विक्रीतील मुख्य अनियमितता घाऊक विक्रेत्यांकडून होत असल्याची शेतकरी व व्यापारी वर्गात चर्चा आहे. अनेक घाऊक विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने व कागदपत्रांची पूर्णता नसल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी एका दुकानातच मोठ्या प्रमाणात खत साठवून ठेवले जाते, तर गरज असतानाही शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.दरम्यान, शेतकरी संघटनांनी घाऊक विक्रेत्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
