नांदेड : कवयित्री, लेखिका आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. वृषाली किन्हाळकर यांना हा पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.आचार्य प्र. के. अत्रे यांची कन्या आणि ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांची जयंती आणि दैनिक मराठा वर्धापन दिन या निमित्ताने हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता दादरच्या वनिता समाज सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व संपादक मधुकर भावे हे या कार्यक्रमाच्या असून ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल इतक्या दर्जेदार साहित्याची निर्मिती करणाऱ्या डॉ. वृषालीताई किन्हाळकर यांना या वर्षीचा ‘श्रीमती शिरीष पै जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या मराठवाड्या मधील त्या पहिल्या लेखिका ठरल्या आहेत.
१९८६ पासून महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या नांदेडसारख्या ठिकाणी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून त्या वैद्यकीय सेवेत आहेत.
‘कन्या भ्रूणहत्या’ या विषयावर १९९५ पासून त्या समाजाचे प्रबोधन करत आहेत. ‘मुलगा हवाच हा अट्टाहास का ?’ या विषयावर महाराष्ट्र भर सातशे पेक्षा अधिक व्याख्याने आणि स्लाईड शो ‘पन्नाशी नंतरचे आरोग्य’ या विषयावर लेखणी व वाणी याद्वारे प्रबोधन.
विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन.
‘समाज स्वास्थ्य’ कार कै. र. धों. कर्वे यांची जयंती – पुण्यतिथी साजरी करत ‘कुटुंब कल्याण आणि स्त्री आरोग्य या संबंधाने’ जन प्रबोधनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन.
या सामाजिक कार्यासाठी कमलताई जामकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार,
शिक्षण महर्षी स्व.व्यंकटेशजी चौधरी पुरस्कार, उमरगा येथील शांताई पुरस्कार, सेलू येथील गीताबाई चारठाणकर पुरस्कार आणि इतर अनेक राज्य पातळीवरचे पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.
” वेदन ” कविता संग्रह , ” तारी ” कविता संग्रह, ” सहज रंग” ललित लेख संग्रह , ” संवेद्य ” – ललित लेख संग्रह , ” वेदन ” चा इंग्रजी अनुवाद “Pangs of Love “, ” मुक्तामाय ” दीर्घ काव्य , ” कागदावरची माणसं ” (आस्वादक समीक्षा) आणि ‘ती आहेच’ (अमृता प्रीतम नंतरचे इमरोज) ‘She lives on’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद , समग्र कविता- “तारी” या शीर्षकाने हिंदीत अनुवाद असे त्यांचे साहित्यिक योगदान राहिले आहे . त्यांचे लेखन महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहे.
त्यामुळे डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या एकूण साहित्य , सामाजिक आणि वैद्यकीय सेवेबद्दल यावर्षीचा शिरीष पै जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल साहित्य आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
