टीआरपी मिळवण्याच्या हव्यासापोटी गोदी मीडिया नेहमीच खळबळजनक, खोटी व बेफिकीर बातम्या प्रसारित करत आली आहे. अशा वृत्तांमुळे संबंधित व्यक्तीची बदनामी होते, त्यांच्या कुटुंबाचा अपमान होतो, आणि त्यांच्या सामाजिक आयुष्यावर व व्यवसायावर गंभीर परिणाम होतो.
भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने राजौरी आणि पूंछ येथे केलेल्या बॉम्बहल्ल्यात,गोळीबारात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. मात्र News18 आणि Zee News या वाहिन्यांनी तो “अतिरेकी” असल्याचे खोटे वृत्त प्रसारित केले. याविरोधात स्थानिक न्यायालयाने या वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलीस यामध्ये वाहिन्यांचा बचाव करत होते आणि न्यायालयाला सांगत होते की ही घटना त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. मात्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलमांचा आधार घेत स्पष्ट सांगितले की न्यायालयास अशा प्रकरणांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे, आणि गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.पत्रकारितेच्या नावाखाली टीआरपी मिळवण्यासाठी केलेल्या या कारवायांवर न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून, स्वतःची वाहिनी “सरकारनिष्ठ” असल्याचे दाखवण्यासाठी काही पत्रकारांनी खोट्या बातम्यांचे खेळ मांडले. न्यायालयाच्या आदेशामुळे या तथाकथित पत्रकारितेचे खरे स्वरूप जनतेसमोर उघड झाले आहे.
हे प्रकरण एखादे अपवादात्मक उदाहरण नाही. मागील दशकभरात गोदी मीडियाने सातत्याने अशा खोट्या, धार्मिक तेढ वाढवणाऱ्या व व्यक्ती आणि समुदायविरोधी बातम्या पसरवल्या आहेत. या माध्यमांनी एकप्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे.मोहम्मद कारी इक्बाल हे एका मदरशामध्ये शिक्षक होते. ते ना अतिरेकी होते, ना त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा होता. तरीही त्यांच्या मृत्यूच्या बातमीत, “मारला गेला मोस्ट वॉन्टेड अतिरेकी” असे मथळे दिले गेले. त्यांचे पूर्ण नाव, फोटो, पत्ता देऊन त्यांच्या कुटुंबाचे सार्वजनिक अपमान करण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की अशा प्रकारच्या बिनबुडाच्या बातम्या एखाद्या कुटुंबाची प्रतिष्ठा जमीनदोस्त करतात.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बाबतीत सुद्धा गोदी मीडियाचीच ही घाणेरडी पद्धत दिसून आली. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकार होते, पण मीडिया त्याला ‘शापित बिग बॉस घर’, ‘पती कुत्र्याला फिरवायला गेला’ अशा अश्लील आणि खोट्या वल्गनांत रंगवत होती. बातम्यांमध्ये ज्योतिषांकडून तिच्या मृत्यूचा “ग्रहदशेशी” संबंध जोडला गेला. इतक्या खालच्या स्तरावर गेलेली ही पत्रकारिता वाचून सामान्य माणसालाही लाज वाटावी.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सुद्धा याच गोदी मीडियाने रिया चक्रवर्तीला खलनायिका ठरवले होते. आज ती न्यायालयीन निर्दोष ठरली आहे, परंतु तिच्याकडे कोणी माफी मागितली का? सोनम रघुवंशी प्रकरण, कोरोना काळात तबलीगी जमातवरील खोटी आरोप, याही घटनांमध्ये गोदी मीडियाने एकाच धर्माला टार्गेट करत खोटी माहिती पसरवण्याचे पद्धतशीर काम केले आहे.
हे सर्व प्रकार केवळ टीआरपी साठी आहेत का? की मग कोणत्या राजकीय अजेंड्यासाठी? हा प्रश्न आता उघडपणे विचारण्याची वेळ आली आहे. पत्रकारितेचे धर्म व नैतिकता यापुढे टिकतील का? की ही माध्यमं केवळ अफवा व द्वेषविक्रीची दुकाने राहतील?
न्यायालयाने ज्या प्रकारे या पत्रकारांना फटकारले आहे, ते फक्त सुरुवात आहे. अशा अनेक खटल्यांतून गोदी मीडिया नामक यंत्रणेची मूळं उपटण्याची गरज आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही ठोस, दूरगामी आणि निर्भीड निर्णय घेण्याची नितांत गरज आहे.