इस्रायलवरील एका दवाखान्यावर इराणने हल्ला केल्यानंतर, इस्रायलचे संरक्षण मंत्री यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी इराणवर “युद्धगुन्हा” केल्याचा आरोपही केला आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा इस्रायलचे नेते इराणविरोधात मोठ्या कारवाईची भाषा करत आहेत. Jerusalem Post च्या अहवालानुसार, दवाखान्यावर झालेल्या या हल्ल्यासाठी इराणचे वरिष्ठ नेते जबाबदार आहेत आणि त्यांना शिक्षा होणारच, असे इस्रायलचे म्हणणे आहे. इराणचे हे नेते अयातुल्ला खोमेनी सध्या एका बंकरमध्ये लपले आहेत, जो इराणच्या लष्करी मुख्यालयाजवळ आहे. .
हल्ला झालेला दवाखाना इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेच्या आत असून, या घटनेमुळे अमेरिका सुद्धा चिंतेत आहे. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की युद्ध आणखी वाढल्यास त्यांना थेट यात उतरावं लागू शकतं. ही शक्यता समोर येताच रशिया आणि चीनने अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा दिला आहे. रशियाने अमेरिकेला सैनिकी हस्तक्षेप न करण्यास सांगितलं आहे आणि परिणाम अत्यंत गंभीर असतील, असं स्पष्ट केलं आहे.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी सांगितले की, इस्रायल जे इराणच्या अणुक्षेत्रांवर करत आहे, त्यामुळे जागतिक विनाश शक्य आहे. “जर तिथे किरणोत्सर्ग झाला, तर जगाचं नुकसान होईल. मग पर्यावरणवादी कुठे आहेत?” असा सवाल त्यांनी केला.
रशिया आणि चीन दोघंही इस्रायलच्या कारवाईची कडाडून निंदा करत आहेत आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत आहेत. ते मानतात की इराणच्या अणुउद्योगांवर सैनिकी कारवाई करणं चुकीचं आहे. अमेरिकेलाही इस्रायलसोबत बॉम्बहल्ल्यांत सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या युद्धाचा शांततेने शेवट व्हावा, असं मानतात. दोघंही देश युद्ध थांबवण्यासाठी चर्चा करत आहेत. मात्र, अमेरिका जर युद्धात सहभागी झाली, तर चीन आणि रशिया दोघंही यामध्ये उतरू शकतात, आणि यामुळे हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकतं.
इराणला रशिया आणि चीनकडून शस्त्रास्त्रे आणि गुप्त माहिती मिळत असल्याने त्यांची ताकद वाढते आहे. अमेरिका जर यामध्ये सहभागी झाली, तर तिचं नुकसान फार मोठं होऊ शकतं.
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अनेक कठोर निर्णय घेतले गेले आहेत. ‘G7’ देशांच्या बैठकीत इस्रायलविरोधात मतं व्यक्त होताच ट्रम्प यांनी ती बैठक सोडून वॉशिंग्टनला परत जाऊन लष्कराला तयारीस सांगितलं.
आज अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक राजकारण दोन गटांत विभागलं गेलं आहे. काही लोकांचं मत आहे की अमेरिका या संघर्षात सहभागी होऊ नये, तर काहींना वाटतं की हल्ला अपरिहार्य आहे.
मध्य पूर्वेत अमेरिकेचे सध्या सुमारे 40,000 सैनिक तैनात आहेत. इराणवर जर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले झाले, तर छोटा देश असलेल्या इस्रायलसाठी तोट्याचं प्रमाण फारच जास्त असेल. इराणचं भूगोल आणि लोकसंख्येच्या दृष्टीने इस्रायलपेक्षा २२ पट मोठं आहे.
जर रशिया, चीन, आणि उत्तर कोरिया यांनी एकत्रितपणे इराणला साथ दिली, तर हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणमधील रशियाच्या मदतीने उभा राहिलेला अणुऊर्जा प्रकल्पही युद्धात धोक्याच्या झोनमध्ये येऊ शकतो. अशा वेळी युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची आणि जागतिक समुदायाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.