नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिलांसाठी डॉ.गर्वितासिंह यांनी हळदी कुंकू तसेच स्नेहमिल कार्यक्रम आयोजित केला. यावेळी त्यांनी महिलांना स्वत: सक्षम व्हावे असा संदेश दिला.

पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे सतत कामाच्या तानात राहतात. याला कोठे तरी दिलासा देण्यासाठी डॉ.गर्वितासिंह यांनी स्नेहमिल आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी अनेक महिला एकत्र आल्याने त्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी सुध्दा देण्यात आली. सर्व पोलीस परिवार एकत्र आल्यामुळे त्यांच्यातील घनिष्ठता वाढली. या कार्यक्रमाकरीता वरिष्ठ नागरीक, एकल महिला, सफाई कामगार, अंशकालीन कर्मचारी यांच्या कुटूंबांना मनोरंजनाची संधी मिळाली.
डॉ.गर्वितासिंह यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी विविध खेळ, प्रश्नमंजुषा, नृत्य आयोजित करण्यात आले होते. पोलीसांसह इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भरोसासेल, बीडीडीएस. पोलीस ठाणे भाग्यनगर, शिवाजीनगर, माळाकोळी, हदगाव व पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध शाखांमधील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी अनेक बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या नृत्य कार्यक्रमातून बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देण्यात आला.

महिलांसाठी लक्की ड्रॉ पध्दतीने पैठणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सौ.सुचिता कांबळे या पैळणी साडी विजेत्या ठरल्या. या प्रसंगी डॉ.गर्वितासिंह यांनी महिलांनी आपल्या स्वबळावर सक्षम होण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरुणा सुगावे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बोरसे, पोलीस उपनिरिक्षक माया भोसले, स्नेहा पिंपरखेडे, जयश्री गिरे, नमिता देशमुख, रेणुका जाधव, किरण बेंबडे, शालीनी गजभारे यांच्यासह अनेक महिला पोलीस अंमलदारांनी केले.

