नांदेड(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांड घटनांमधील आरोपींविरुध्द खूनाचे आणि ऍट्रॉसिटी कायद्याचे गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत व्हावा असे निवेदन भिमसैनिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना दिले आहे.
लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांड घटना संदर्भाने त्या आरोपींविरुध्द खूनाचे आणि ऍट्रॉसिटी कायद्याचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करून ते प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. मयत दलित युवक, विद्यार्थी व अत्याचारीत कुटूंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी भिमसैनिकांनी 9 ऑगस्ट रोजी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना निवेदन दिले आहे. दलित हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा लवकरच अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
लातूर शहरात व जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून विविध ठिकाणी दलित समाजातील युवक, विद्यार्थ्यांना जातीय द्वेषातून लक्ष केले जात आहे. त्यांच्या आमनुशपणे हत्या करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने लातूर शहरातील एमआयडीसी भागातील जेएसपीएम या शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ वस्तीगृहात राहणाऱ्या सातव्या इयतेत शिकणाऱ्या 13 वर्षीय बालक अरविंद राजाभाऊ खोपे याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चाकूर तालुक्यातील नायगाव येथे एका अल्पवयीन बालिकेवर मुलींच्या वस्तीगृहात अत्याचार करून खून करण्यात आला आहे. उदगीर पोलीस ठाण्याअंतर्गत देवणी येथे शिवाजी सुर्यवंशी या युवकाचाही जातीय द्वेषातून खून करण्यात आला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र सचिव चंद्रकांत चिकटे, महाराष्ट्र प्रदेश संघटक विजयदादा सोनवणे, भिमशक्तीचे मोहन माने, प्रा.अनंत लांडगे, ऍड.अतिश चिकटे, अशोक कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड, युथ पॅंथरचे संतोष वाघमारे, कॉंगे्रसचे यशपाल कांबळे, प्रताप कांबळे, ब्लु पॅंथरचे साधु गायकवाड, रिपाई गटाचे नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, सचिन सांगवीकर, प्रतिक सोनवणे, रामा चिंतोरे आदींसह तीन पिडीत कुटूंबांचे नातेवाईक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थिती होते.