नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक साहेब नांदेड शहरात, जिल्ह्यात आणि शहराच्या आसपास 52 पत्यांचा जुगार सुध्दा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर कार्यवाही कोण करणार?
पोलीस उपमहानिरिक्षक या पदावर शहाजी उमाप रुजू झाल्यानंतर नांदेडकरांनी मागील पाच ते सहा वर्षापासून सुरू असलेले सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा केली होती. शहाजी उमाप यांनी आल्यावर नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्रेत्यांवर बऱ्याच कार्यवाही केल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत. या संदर्भाने प्रसार माध्यमांनी सुध्दा शहाजी उमाप यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. फक्त अवैध दारु हा एकच अवैध धंदा नाही. अवैध धंद्यांमध्ये गुटखा, मटका, जुगार अड्डे, बायोडिझेल, हवाला असे अनेक अवैध धंदे आहेत. पण त्यांच्यावर कोणती कार्यवाही झाल्याचे दिसले नाही.
नांदेड शहरात माळटेकडी पुलाच्या उजवीकडे, इतवारा भागातील मॅफ्को येथील मोकळ्या जागेत, गाडीपुरा भागात, नांदेड-बारड रस्त्यावर उजीवकडे वळण घेतल्यावर डाव्या बाजूला अशा अनेक ठिकाणी 52 पत्यांच्या जुगाराचे अड्डे सुरू आहेत. या जुगार अड्ड्यांवर कोण कार्यवाही करणार या प्रश्नाचे उत्तर नांदेडच्या जनतेने कोणाकडे मागावे. सोबत गुटखा, मटका, बायोडिझेल, हवाला, अवैध वाळू या धंद्यांचे तर उल्लेख करणे अवघड आहे. त्यात काही पोलीस अधिकारी सांगतात अवैध रेती आणि गुटखा यावर कार्यवाही करण्याचा आम्हाला अधिकार नाही. पण जेंव्हा कार्यवाही होते त्यावेळी पोलीस विभागच त्या संबंधाचे प्रसिध्दी पत्रक तयार करून प्रसार माध्यमांकडे पाठवितात. वाळूच्या व्यवसायामध्ये असे अनंत मंडळी सहभागी आहेत ज्यांच्याशी बोलायला सुध्दा पोलीसांना अवघड होत असते. सेक्शन पंप लावून नदीतून वाळू उपसली जाते. महसुल कायद्यानुसार हे चुकीचे आहे. वाळू वाहतुक सुध्दा सुर्यास्त ते सुर्योदय यावेळेत करता येत नाही. त्यामुळे अवैध धंदे पुर्ण पणे बंद झाले असे म्हणतात येणार नाही.