नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागाने काल भरपूर अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले मात्र नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासामध्ये भरपूर चोऱ्या झाल्या आहेत.
अशोकनगर मुखेड येथे राहणारे गंगाधर किशनराव बारुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 ऑगस्टच्या सकाळी 10.20 ते 11.10 वाजेदरम्यान अर्थात अर्ध्या तासात त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी त्यामधून विविध सोन्याचे दागिणे असा एकूण 2 लाख 34 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही चोरीची घटना गुन्हा क्रमांक 278/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हुडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
विजयनगरमध्ये राहणारे संजय जर्नाधन खाडीलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑगस्टच्या रात्री 10 ते 3 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेदरम्यान विजयनगरमधील त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यामधून विविध सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 1 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 317/2024 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत.
ऊस तोड मुकदम असलेले अंकुश रामराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे ताईबाई तांडा ता.मुखेड येथे त्यांचे घर आहे. 5 ऑगस्टच्या सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून 2 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम आणि 70 हजार रुपये सोन्याचे दागिणे असा 3 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 168/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक अमर केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
शेख दस्तगिर अब्दुल खादर यांचे ईस्लामपूरा भागात घर आहे. दि.5 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजता त्यांच्या घराचे दार उघडे होते आणि याचा फायदा चोरट्यांनी घेवून आत प्रवेश केला आणि त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 7 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 301/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हबीब चाऊस अधिक तपास करीत आहेत. याशिवाय सुध्दा चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. परंतू त्यांची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे आणि भारतीय न्याय संहितेत अदखल पात्र गुन्हे असल्यामुळे आम्ही त्यांना बातमीमध्ये सुध्दा जागा दिलेली नाही.