नांदेड(प्रतिनिधी)-आपण एकदा ठरवले की आपल्याला ध्येय गाठायचे आहे. तेंव्हा त्या ध्येयांकडे जाणाऱ्या मार्गातील अडचणींचा विचार न करता सतत प्रवास करणारे नक्कीच ध्येय गाठतात. भल्या पहाटे लोकांच्या वाचनासाठी वर्तमान पत्र टाकून, शाळा शिकून एका बालकाने दहावीच्या परिक्षेत 90.70 टक्के गुण संपादन करून इतरांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम असतांना विक्रांत हरीष यादव आपल्या आई-वडीलांसह विष्णुनगरमधील 10 फुट रुंद, 10 फुट लांब अशा खोलीत राहत होता. विक्रांत दोन भावंडे आहेत. विक्रांतचे वडील हरीष यादव टी.व्ही.एस.शोरुमध्ये काम करतात. विक्रांतच्या आई नंदीनी एका खाजगी खानावळीमध्ये कार्यरत आहेत. आपल्या आई-वडीलांची परिस्थिती लक्षात घेवून लहान वयापासूनच विक्रांत वर्तमान पत्र वाटप करण्याचे काम करत होता. त्यातून तो सुध्दा पैस कमवत होता. वर्तमान पत्र वाटून तो गुजराती हायस्कुलमध्ये शिकायला जायचा. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील सुध्दा भरपूर पाठबळ देत होते आणि मुलगाही त्या मार्गावरच होता. यंदाच्या आलेल्या दहावीच्या निकालात विक्रांत हरीष यादवने 90.70 टक्के गुण मिळवले आहेत. त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. गुजरातील हायस्कुलच्या शिक्षकांनी सुध्दा त्याचे भरपूर कौतुक केले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा विक्रांतला अभिनंदनाची शाब्बासकी देत असून भविष्यासाठी शुभकामना पण प्रेषित करत आहे.