नांदेड(प्रतिनिधि)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना १ जून पासून सुरुवात होणार असून यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठवाड्याच्या विकासात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नेहमीच योगदान राहीले आहे. यात पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर स्तरावर एम. एस्सी. डेटा सायन्स, जिओइन्फॉर्मटिक्स, औद्योगिक मानसशास्त्र, पदवीस्तरावर बी.एस्सी. डेटा सायंस, बी.सी.ए आर्टिफिशीयल ईंटिलीजन्स, मशीन लर्निंग, बी.बी.ए, बी.एम.एल.टी, न्यूट्रिशियन अँड डायट्स, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन बँकिंग, डिप्लोमा इन मोबाईल रिपेरिंग, ब्युटी अँड कॉस्मेटिक्स, सायबर सेक्युरिटी अशा प्रकारचे रोजगार उपलब्ध होणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमा सोबतच व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रमही या वर्षीपासून सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबविले जाणार आहेत.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (एफ.टी.आय.आय.) यांच्या सोबत चित्रपट व मीडिया संबंधी विविध अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन एक्टिंग, स्मार्टफोन फिल्म मेकिंग, एक वर्ष कालावधीचा स्क्रीन प्ले रायटिंग व सर्टिफिकेट इन ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन असे अभ्यासक्रम राबविल्या जाणार आहेत.
फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त संस्था आहे. एफ.टी. आय. आय. येथील प्राध्यापक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन या अभ्यासक्रमांना मिळणार आहे. त्यामुळे माध्यम आणि सिनेमाच्या क्षेत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील, असा विश्वासही कुलगुरू डॉ. मनोज चासकर यांनी यावेळी व्यक्त केला.
निर्धारित वेळेत परिक्षेचे निकाल
विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल निर्धारित वेळेत लावण्याकरिता यावर्षी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा झाल्यापासून १० ते १२ दिवसात निकाल देण्याच्या प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे एकूण ५५ विषयाचे निकाल १५ दिवसांच्या आत जाहीर करण्यात आलेले आहेत तर उर्वरित विषयांचे निकाल ३१ मे पर्यंत जाहीर होतील असा विश्वास कुलगुरू डॉ. चासकर यांनी व्यक्त केला. विद्यापीठाने फार्मसी या अभ्यासक्रमाचे यावर्षीपासून ऑन स्क्रीन उत्तरपत्रिका तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यास यश आल्याचे ते म्हणाले.
संशोधनासाठी सुविधा
विद्यापीठ परिसरात संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी केंद्रीय पद्धतीवर अद्यावत सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात संशोधनासाठी आवश्यक अशी उपकरणे असणार आहेत. याचा फायदा प्राध्यापक व विद्यार्थी यांना होईल असा विश्वास यावेळी डॉ. चासकर यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयांना मदत
विद्यापीठाने महाविद्यालयांच्या विकासासाठी नुकतीच क़्यु.आय.पी. ही योजना सुरु केली असून त्याअंर्गत संलग्नित महाविद्यालयात परीक्षा केंद्रासाठी झेरॉक्स मशीन, प्रिंटर, सी.सी.टीव्ही सुविधा, संगणक, व इनडोअर सुविधेसाठी ७० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. चासकर यांनी सांगितले. यामुळे संलग्नित महाविद्यालये विकसित होण्यास मदत होईल, अशी खात्री डॉ. चासकर यांनी व्यक्त केली.
यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, माध्यमशास्त्र संकुलाचे प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची उपस्थिती होती.