ईदच्या स्टेटसमुळे नांदेडच्या दोन महिला वकीलांमध्ये जुंपली

एकीने ऍट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली
नांदेड(प्रतिनिधी)-ईदचे व्हाटसऍप स्टेटस ठेवल्यानंतर दोन महिला वकीलांमध्ये चांगलीच जुंपली. या दोन महिलांमधील एक महिला अनुसूचित जातीची आहे. त्यांनी पोलीस अधिक्षक नांदेड आणि अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यांच्याकडे अर्ज देवून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या महिला वकीलाविरुध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.
नांदेड जिल्हा अभिवक्ता संघामध्ये एक 36 वर्षीय महिला वकील अनुसूचित जातीच्या आहेत. त्यांनी रमजान ईद दिनाच्या शुभकामना देण्यासाठी आपल्या मोबाईलवरील व्हाटसऍपवर 10 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता स्टेटस ठेवले. त्यानंतर त्या स्टेटसवर नांदेड अभिवक्ता संघातील दुसऱ्या एका महिला वकीलांनी उत्तर दिले. स्टेटस का ठेवले असे लिहिले, तु मुस्लिम आहेस काय? असे लिहिले पण त्याकडे मी दुर्लक्ष केले असे अनुसूचित जातीच्या वकील महिलेने आपल्या अर्जात लिहिले आहे.
दि.12 एप्रिल रोजी न्यायालयाच्या मध्यांतर काळात दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान अनुसूचित जातीच्या वकील महिला ह्या महिला वकीलांच्या कक्षात जेवत असतांना त्यांच्या स्टेटसवर कॉमेंट करणाऱ्या महिला वकील आल्या आणि बासा ईद मुबारक असे म्हणून विचित्र हावभाव करून मला चिडवले. मुस्लिम समाजाबद्दल सुध्दा घाणेरडे शब्द वापरुन त्या महिला वकील बोलत होत्या. तेंव्हा त्यांनी मला जातीवाचक उल्लेख करून माझे पाळलेले गुंड आहेत. मी त्यांना बोलावून तुला मारेल असे सांगितले. या ठिकाणी रंगभेदचा उल्लेख पण त्या महिलेने केला असे अर्जात लिहिले आहे. अनुसुचित जातीच्या महिला वकीलांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की, मी भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार वागते, सर्व धर्म समभाव मानते, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीबरोबर राहण्याचा मला अधिकार आहे. तेंव्हा यावर दुसऱ्या वकील महिलेने पुन्हा रंगभेदाचा उल्लेख करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे असे अर्जात लिहिले आहे.
मी फक्त हिंदु धर्माविषयी चांगले बोलावे, इतर धर्माविषयी बोलू नये असा दबाव ती महिला वकील आणत आहे. तसेच भविष्यात मला काही धोका झाला किंवा मला काही इजा झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी त्या महिलेची आहे. भारतीय संविधानाने जातीयवाद संपविला असतांना आजही समाजात जातीयता निर्माण केली जात आहे. त्यांना कठोर शिक्षा होवून समाजात समानता प्रस्तापित करण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बार मध्ये दलित वर्गाला धारेवर धरुन त्यांच्या मुलभुत हक्कांचे उल्लंघन होत आहे.नैसर्गिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी माझ्यासोबत जातीय वाचक शब्द वापरून धमक्या देणाऱ्या महिला वकीलाविरुध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस अधिक्षक नांदेड आणि अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यांच्याकडे पण केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *