परभणी (प्रतिनिधी):- नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘जनसंवाद’ उपक्रमाला सुरुवात केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील तक्रारदार नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम राबविण्यात येत असून, पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत करून लोकाभिमुख कामकाजाला प्राधान्य देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. परभणी जिल्ह्याच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत त्यांनी तक्रारदार नागरिकांशी थेट संवाद साधला. या कालावधीत एकूण १७ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सादर केले. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय यांसह विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे ‘संवेदना’ या तक्रार निवारण प्रणालीद्वारे पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्गीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींवर केवळ अर्ज स्वीकारण्यापुरती कार्यवाही न करता त्यांचे निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 134 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घराचा दरवाजा तोडून 67 हजारांचा ऐवज लंपास २१ गुंठे जमिनीच्या व्यवहारातून ३१.५० लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा