औंढा नागनाथमध्ये ४ लाख ३५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; तस्करांचे धाबे दणाणले!

औंढा नागनाथ (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक  शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने हिंगोली जिल्ह्यात धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी औंढा नागनाथ येथील खातीब कॉलनीत छापा टाकून ४ लाख ३४ हजार ९९६ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला आहे.

खातीब कॉलनीत घरावर थेट छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस ठाणे औंढा नागनाथ हद्दीतील खातीब कॉलनी (हिंगोली रोड) येथे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, विशेष पथकाने ५ ऑक्टोबर रोजी संशयित वाहबोद्दीन खमरोद्दीन खातीब याच्या घरावर थेट छापा मारला. या धाडीत गुटख्यासह राज निवास पान मसाला, गोवा, आरएमडी, विमल, सुगंधी जर्दा आणि जाफरानी जर्दा असा एकूण ४,३४,९९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कडक कलमांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणात आरोपी वाहबोद्दीन खमरोद्दीन खातीब याच्याविरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९९२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १२३, २३३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ च्या कलम २६(२)(iv), २७(३)(e), २७(३)(d), ३०(२)(a) व ५९ अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी या धडक कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. अवैध व्यावसायिकांवर धाडसी प्रहार करणाऱ्या या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.

खबर हेल्पलाइनवर गुप्त माहिती देण्याचे आवाहन

परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा विशेष मोबाईल क्रमांक असलेली खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील कोणत्याही अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!