अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. यु. चौधरी यांचा निर्णय नांदेड (विशेष बातमीदार) – नांदेड शहरातील भाग्यनगर रोडवरील आय.आय.बी. कोचिंग क्लासेससमोर कॉलेजवरून घरी जाणाऱ्या एका बी.एससी.च्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून खंजराने पाठीवर, पोटावर व छातीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी रोहित शिवाजी पोहरे (वय २२ वर्षे, रा. राहुल कॉलनी, तरोडा बु., नांदेड) याला विशेष न्यायाधीश बी. यु. चौधरी यांनी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट एम. ए. बतूला (डांगे) यांनी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रणजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात भक्कम बाजू मांडून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. गुन्ह्याची पार्श्वभूमी व फिर्याद भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गु.र.नं. ५७३/२०२६ नुसार, या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीचे वडील यांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही नांदेड येथे बी.एससी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपी रोहित पोहरे हा मागील दोन वर्षांपासून तिचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी व संबंध ठेवण्यासाठी वारंवार त्रास देत होता तसेच जीवे मारण्याची धमकी देत होता. पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला वारंवार समज देऊनही त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नव्हती. ५ ऑक्टोबर रोजी घडलेला थरार व प्राणघातक हल्ला दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर पीडित मुलगी तिच्या मैत्रिणी साक्षी कांबळे व मयुरी वाहुळे यांच्यासोबत घराकडे पायी जात होती. भाग्यनगर रोडवरील आय.आय.बी. कोचिंग क्लासेससमोर आरोपी रोहित पोहरे याने तिला अडवले आणि बोलण्यासाठी व लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मैत्रिणींनी मध्यस्थी करून आरोपीला बाजूला केले व त्या पुढे जाऊ लागल्या असता, आरोपी रोहितने पाठीमागून येऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने खंजराने पीडितेच्या पाठीवर, छातीवर व पोटावर डाव्या बाजूला गंभीर वार केले. विद्यार्थिनीने वार हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या उजव्या हातालाही गंभीर दुखापत झाली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तत्काळ श्री गंगा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांची कारवाई व मुद्देमाल जप्ती घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २३:१५ वाजता कैलासनगर परिसरातून आरोपी रोहित पोहरे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले कमर्शियल खंजर आणि काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 26 BM 9143) जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न), ७५, ७८, ३५१(३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम १२ आणि आर्म्स ॲक्ट कलम ४, २५ अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद व कोठडीची कारणे न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकील ॲडव्होकेट एम. ए. बतूला (डांगे) यांनी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रणजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोठडीच्या आवश्यकतेबाबत पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले: १. आरोपीने खंजराने केलेल्या गंभीर वारामुळे पीडितेची वैद्यकीय स्थिती अत्यंत चिंताजनक असून अंतिम वैद्यकीय अहवाल व डॉक्टरांचे मत घेणे बाकी आहे. २. गुन्ह्यात वापरलेले घातक खंजर आरोपीला कोणी पुरवले व ते कोठून आणले याचा शोध घेणे बाकी आहे. ३. घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून गुन्ह्यात इतर कोणी साथीदार सहभागी होते का, याचा तपास करायचा आहे. ४. आरोपी पीडितेच्या व तिच्या कुटुंबाच्या मोबाईलवर कॉल व मेसेज करून धमक्या देत असल्याने त्याचा मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे. ५. आरोपीचे रक्ताचे नमुने, फिंगर प्रिंट्स (ठसे) आणि घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे बाकी आहे. न्यायालयाचा आदेश भाग्यनगर पोलिसांनी सादर केलेला पोलीस कस्टडी रिमांड अर्ज आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश बी. यु. चौधरी यांनी आरोपी रोहित पोहरे याला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस कॉलनीतील जिम्नास्टिक हॉलच्या वापराबाबत चौकशीची मागणी हिंगोलीत डीआयजीच्या विशेष पथकाचा धडाकेबाज छापा