आठ राज्यांसह रशियातील कलाकारांचा सहभाग; तृतीयपंथी सक्षमीकरण, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक वैविध्याचा अनोखा संगम
नांदेडमध्ये तीन दिवस रंगला भारतीय कला-संस्कृतीचा भव्य उत्सव
नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती, लोककला, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि सर्वसमावेशक विकासाचा अनोखा संगम घडविणारा ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव–२०२६’ नांदेडच्या कुसुम सभागृहात १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड, विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील नृत्य व संगीत स्पर्धा, लोककला सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, भव्य मोफत आरोग्य शिबिर, तृतीयपंथी सक्षमीकरण चर्चासत्र, रोजगार व स्वयंरोजगार उपक्रम, पुरस्कार वितरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
गेल्या दहा वर्षांपासून नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाने यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांना एकत्र आणत भव्य सांस्कृतिक पर्व साकारले. या महोत्सवात महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमधून सुमारे ४७० कलाकारांनी विविध कला प्रकार सादर केले, तर रशियातून आलेल्या कलाकारांनीही सहभाग नोंदवत या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. शास्त्रीय नृत्य, उपशास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, लावणी, गायन, वाद्यवादन, समूह नृत्य अशा विविध कला प्रकारांनी तीनही दिवस कुसुम सभागृहाचा परिसर भारावून गेला.


महोत्सवासाठी विविध रंगमंच उभारण्यात आले होते. मुख्य रंगमंचाला ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले रंगमंच’ असे नाव देण्यात आले होते. या रंगमंचावर देशभरातून आलेल्या कलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी आणि मणिपुरी यांसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांसह विविध राज्यांतील लोकनृत्य आणि लोककलेने नांदेडकरांची मने जिंकली. दुसऱ्या रंगमंचावर संगीत स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये तब्बल ९५ कलाकारांनी सहभाग नोंदविला. तिसऱ्या रंगमंचावर वक्तृत्व स्पर्धेत ३० स्पर्धकांनी आपले उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले.
महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये कलाकारांसोबतच विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात आले. आंतरशालेय वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांसह संगीत गायनाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्ती, संस्कृती, पर्यावरण, सामाजिक समता आणि संवैधानिक मूल्ये अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कला आणि विचार मांडले. जिल्हा परिषद नांदेडच्या विशेष सहकार्यामुळे या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला आणि जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.
महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम अविरत सुरू होते. दिवसभर शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोककलेच्या विविध प्रकारांचे सादरीकरण झाले. विशेषतः दररोज सायंकाळी सादर करण्यात आलेल्या ‘लावणी’ या विशेष कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोककला, लावणी, नृत्य आणि नाट्य यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांनी सप्तरंगच्या सांस्कृतिक व्यासपीठाची वेगळी ओळख निर्माण केली.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित राहिले नाही, तर सामाजिक बांधिलकीचा आदर्शही या माध्यमातून निर्माण करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी फिजिओथेरपी कॉलेज नांदेडने मोफत फिजिओथेरपी सेवा दिली, तर दुसऱ्या दिवशी लायन्स क्लब नेत्रालय नांदेडच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी सेवा देण्यात आली. तिसऱ्या दिवशी गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांच्या अथक सहकार्याने २० रुग्णांच्या एंडोस्कोपी तपासण्या करण्यात आल्या. एंडोस्कोपी शल्यचिकित्सक डॉ. नितीन जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सेवा बजावली. आरोग्य शिबिरामध्ये फिजिओथेरपी, नेत्रतपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, सामान्य आरोग्य तपासणी, दंततपासणी, ईसीजी तसेच एंडोस्कोपी यांसारख्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या आरोग्यसेवा उपक्रमाला विविध विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनीही मोठे सहकार्य केले. एनएसओ हरियाणा येथून ३६ विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचे प्रमुख जितेंद्र कुमार नरवाल, आशिष कुमार, ग्रामीण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नांदेडचे ११ विद्यार्थी, आयएटीएम कॉलेज नांदेडचे ३० विद्यार्थी तसेच एमजीएम कॉलेजचे ९ विद्यार्थी यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडत कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात आणि सेवा उपक्रमात चोख भूमिका बजावली.
सप्तरंग महोत्सवाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तृतीयपंथी सक्षमीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले. तृतीयपंथी सक्षमीकरण, जनजागृती, रोजगाराच्या संधी, शासनाच्या विविध योजना, स्वावलंबन, सामाजिक न्याय, कायदेशीर हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तज्ज्ञांनी तृतीयपंथी समाजाला उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुल सावे यांनी तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी नांदेडमध्ये तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अतुल सावे होते. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी महेश पाटील, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, भाजपा उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर, मीन गिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महोत्सवात ‘सखी किचन’ फूड व्हॅनचा उपक्रम सुरू करण्यात आला. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असून सांस्कृतिक सक्षमीकरणासोबत आर्थिक सक्षमीकरणावरही भर देण्याचा संदेश सप्तरंग महोत्सवाने दिला.
महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. डॉ. हंसराज वैद्य यांना सप्तरंग लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार, डॉ. नितीन जोशी यांना सप्तरंग आरोग्य भूषण पुरस्कार, अॅड. दिलीपसिंग ठाकूर यांना सप्तरंग सोशल आयकॉन पुरस्कार, मनीष बियाणी आणि गो स्वास्थ सेवा समिती यांना सप्तरंग समाजसेवा पुरस्कार, राधे राधे प्रभात फेरी ग्रुपला सप्तरंग धर्म जागृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच काजल नायक, जालना आणि फरीदा बक्षगुरू माय यांना किन्नर अस्मिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव करण्याची परंपरा महोत्सवात यंदाही कायम ठेवण्यात आली.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कलाकारांसोबतच विविध कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या गुरूंचाही गुरू कला उपासक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कला साधना, कला संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत कलापरंपरा पोहोचविणाऱ्या गुरूंच्या योगदानाचा या माध्यमातून गौरव करण्यात आला. विविध कला प्रकारातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या कलाकारांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या महोत्सवाचे परीक्षक म्हणून मुंबईच्या तमन्ना नायर, कोलकात्याचे कुशल भट्टाचार्य, मुंबईच्या पल्लवी मुखर्जी, भरतनाट्यम व कुचीपुडी नृत्यकलेत प्रावीण्य असलेल्या नागपूरच्या डॉ. पूजा हिरवडे, जगदीश देशमुख, प्रमोद देशपांडे आणि पंडित उल्हास गारोळे आदींनी जबाबदारी पार पाडली. विविध राज्यांमधून आलेल्या कलाकारांच्या सादरीकरणाचे परीक्षण अनुभवी परीक्षकांनी केले.
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी नांदेड उत्तरचे आमदार श्री. बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या समारोपावेळी कलाकार, विद्यार्थी, परीक्षक, स्वयंसेवक, आयोजक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक आणि प्रा. डॉ. अश्विनी चौधरी यांनी सुरेख पद्धतीने केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सप्तरंग सेवाभावी संस्थेचे सचिव अक्षय लक्ष्मणराव कदम, उपाध्यक्ष अब्दुल नईम खान, सहसचिव गणेश चांडोळकर, डॉ. बालाजी पेनुरकर, प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक, प्रा. डॉ. लक्ष्मी पुराणशेट्टीवार, कविता जोशी, प्रमोद देशपांडे, डॉ. उज्ज्वला सदावर्ते, हरीश लालवानी तसेच संपूर्ण संयोजन समितीने परिश्रम घेतले.
युवा समितीच्या विनायक कदम, अजिंक्य धर्माधिकारी, राजेश्री जोशी, पद्मजा बुलबुले, देवयानी जोशी, शुभम होवाळ, अक्षय नरवाडे, हरीश काळे, यशोदीप वाठोरे, शुभम भारतीय, साक्षी मणियार, प्राची गुरव, शिवानी ओझा, मंगेश महाराज, लखन वापराणी आणि ज्योती पाटील आदी सदस्यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण महोत्सवाचे नेतृत्व मुख्य संयोजिका डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले. सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, नांदेड तथा अध्यक्ष – सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड या जबाबदाऱ्यांसह त्यांनी कला, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि तृतीयपंथी सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांना एकत्र आणत महोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. त्यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून नांदेडमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना व्यासपीठ मिळाले.
सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हा केवळ नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम नसून भारतीय संस्कृती, लोकपरंपरा, सामाजिक समता, आरोग्यसेवा आणि सर्वसमावेशक विकासाचा जिवंत उत्सव असल्याचे या तीन दिवसांच्या आयोजनातून स्पष्ट झाले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी नांदेडकरांना भारताच्या विविधतेचे दर्शन घडविले, तर तृतीयपंथी सक्षमीकरण आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दाखविली.
तीन दिवस सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या भव्य महोत्सवाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कलाकार, विद्यार्थी, गुरू, परीक्षक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्या सामूहिक सहभागातून साकारलेला सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव–२०२६ नांदेडच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरला असून, भारतीय कला आणि संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर जोडणारे नांदेडचे हे व्यासपीठ आगामी काळात आणखी व्यापक होण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
