अर्धापूर (प्रतिनिधी): नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरुद्ध राबवल्या जात असलेल्या विशेष मोहिमेला अर्धापूर पोलीस ठाण्याने मोठे यश मिळवून दिले आहे. पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून, यामध्ये सहा आरोपींना अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शालेय पोषण आहार चोरीचा १००% तपास मौजे खरब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ४ ते ५ ऑगस्ट २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या इमारतीचे कडी-कोडा आणि कुलूप तोडून विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे साहित्य चोरून नेले होते. अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक स्थापन केले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जमील खान अंबीया खान (१९ वर्ष) आणि शेख शाहेद शेख चाँद (१९ वर्ष) या दोघांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला ३०,८५० रुपये किमतीचा शालेय पोषण आहार १००% हस्तगत करण्यात आला आहे.
दीड लाखांच्या दोन मोटारसायकली जप्त दुसऱ्या एका कारवाईत, खुबा कॉलनी परिसरातून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या माहितीवरून पोलिसांनी शेख शाहेद शेख चाँद आणि शेख सुलेमान शेख जिलानी ऊर्फ पप्पू (२२ वर्ष, रा. नांदेड) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दीड लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
चाकूचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद २७ मे २०२६ रोजी नांदेड-हिंगोली रोडवर चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख १३,००० रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या जबरी चोरीच्या (Robbery) गुन्ह्यात पोलिसांनी मोहम्मद सुफियान मोहम्मद शकील, मोहम्मद इस्माईल खान मोहम्मद अहेमद खान आणि शेख इलियास या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११,००० रुपये किमतीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्देमालासाठी तपास सुरू आहे.
यांनी केली यशस्वी कामगिरी ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन,पोलीस उप अधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, पोलीस अंमलदार गोणारकर, घोरपडे, मुंगल, डांगे, बेग, विजय कदम, शहा, भिसे, पुलकूटवार आणि महिला अंमलदार इंदू गवळी व बोकारे यांनी पार पाडली आहे.
