नांदेड (प्रतिनिधी)- शनिवारची सकाळ उजाडताच शहरातील बाफना परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यापारी संकुलातील संगम कार बाजार या दुकानासमोर सुमारे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या नागरिकांना दुकानासमोर एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेली दिसली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. प्रथमदर्शनी मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत असून, दगडाने डोक्यात वार करून हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि ही हत्या आहे की अन्य काही प्रकार, हे तपास आणि शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृत व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतपणे पटलेली नाही. परिसरात या व्यक्तीबाबत वेगवेगळी नावे सांगितली जात असली तरी पोलिसांनी अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत पुष्टी केलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळावरील प्रत्येक बाब तपासली जात असून, मृत व्यक्ती येथे कशी पोहोचली? रात्री नेमके काय घडले? त्याच्यासोबत आणखी कोणी होते का? आणि मृत्यूमागे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. घटनास्थळावरून मिळणारे पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेने बाफना परिसरात सकाळपासूनच मोठी चर्चा सुरू झाली आहे. मृताची ओळख आणि मृत्यूचे गूढ उकलल्यानंतरच या प्रकरणाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,726 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाजप-आरएसएस इतिहासातील सर्वात मोठ्या पेचात: लगाम नसलेल्या घोड्याची सवारी नडणार? अर्धापूर पोलिसांची कामगिरी: तीन गंभीर गुन्हे उघडकीस, सहा आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल जप्त