रोज ज्वेलर्समध्ये तब्बल ७४.२४ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध एमपीआयडीसह गुन्हा; बनावट परवान्याच्या नावाखाली ६,५०० रुपयांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील अस्सार कॉलनी येथील रोज ज्वेलर्समध्ये तब्बल ७४ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच एमपीआयडी कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर साक्षीदारांकडून सोने तसेच ऑनलाइन पद्धतीने रक्कम स्वीकारली. या गुंतवणुकीवर अधिक मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट बँक आदेश आणि बनावट बाँड पेपर तयार करून त्यावर शिक्के मारून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर एकूण ७४ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी मोहम्मद फैजल मोहम्मद एजाज (वय ३०, रा. अस्सार कॉलनी, देगलूर नाका, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आलिया जिशान अन्वर शेख, जिशान अन्वर शेख, शेख आवेश अख्तर आणि शेख जेद शेख आवेश अख्तर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 बनावट परवान्याच्या नावाखाली ६,५०० रुपयांची फसवणूक


माहूर तालुक्यातील एका दूध डेअरी व्यावसायिकाची बनावट परवाना तयार करून देण्याच्या बहाण्याने ६,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२३ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने स्वतःला सरकारी केंद्राचा चालक असल्याचे सांगून फिर्यादीकडून ६,५०० रुपये घेतले. त्यानंतर दूध डेअरी दुकानाचा बनावट परवाना तयार करून तो खरा असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी अतुल अनंतराव केशवे (रा. आष्टा, ता. माहूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी भामुरे रेवणकर याच्याविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१८ व ३४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!