नोकरानेच मालकाला घातला गंडा; रोकडसह ऑनलाइन ७३ हजारांची चोरी

नांदेड (प्रतिनिधी) –  शहरातील वजीराबाद परिसरात एका ट्रॅव्हल्स कंपनीत काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करत दुकानातील रोकड आणि ऑनलाइन व्यवहारातून एकूण ७३ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली गेट परिसरातील ऑलकर नाईट ट्रॅव्हल्स येथे काम करणारा कुलभूषण नागारसेन वाघमारे (वय ३०, रा. राहुलनगर, नांदेड) याने फिर्यादी सोनबा तुकाराम नागरे (वय ४८, रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) यांच्या दुकानातील गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोकड चोरली. तसेच खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ५८ हजार ५०० रुपये स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे तपासात समोर आले.

या घटनेनंतर फिर्यादी यांनी वजीराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०६ अन्वये गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वजीराबाद पोलिस करीत असून, आरोपीच्या हालचालींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नोकरानेच मालकाचा विश्वासघात करून चोरी केल्याने व्यापारी वर्गातही या घटनेची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!