पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अलीभाई टॉवर, शिवाजीनगर, नांदेड येथे विनय मदनलाल भंडारी यांनी एका अर्जदाराच्या पतीस रु. १ लाख रक्कम २.७ टक्के व्याजदराने दिली होती. त्यापैकी रु. ६९ हजार इतकी रक्कम अद्याप येणे असल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान संबंधिताने स्वतःच्या नावाने नवीन सावकारी परवान्यासाठी अर्ज करून अनुज्ञप्ती मिळविल्याचे सांगितले. मात्र चौकशी अधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या जबाबात संबंधित व्यक्ती ही फायनान्स सर्व्हिसेस प्रा. लि. या रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थेची भागधारक किंवा संचालक असल्याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधिताने सक्षम प्राधिकरणाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी सहकार अधिकारी बालाजी भुजंगराव बोधगिरे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ४० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पाटोळे करीत आहेत.
