नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलाने माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स (CCTNS) या प्रणालीच्या मासिक मूल्यांकनात नांदेड जिल्हा पोलिसांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे यांच्या स्तरावर दरमहा राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामकाजाचे मूल्यमापन केले जाते. एप्रिल २०२६ महिन्याच्या मूल्यांकनात विविध निकषांवर नांदेड जिल्ह्याने २०१ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
नांदेड जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांमधील प्रथम खबर (FIR), घटना पंचनामे, आरोपी अटक, मुद्देमाल जप्ती, दोषारोपपत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम, अनोळखी मृतदेह, प्रतिबंधक कारवाई तसेच इतर आवश्यक नोंदी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सीसीटीएनएस प्रणालीत नोंदविण्यात आल्या. यामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक झाला असून ITSSO, ICJS, Cri-MAC तसेच Citizen Portal वरील e-Complaint प्रणालीचाही प्रभावी वापर करण्यात आला.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक, संबंधित अधिकारी व सीसीटीएनएस टीमच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे शक्य झाली. या यशाबद्दल जिल्हा पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकाभिमुख व परिणामकारक पोलीस सेवा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
